कटाक्ष: भाजपची वाढ समाजवादी आणि कम्युनिस्टांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे! जयंत माईणकर

0
437

कटाक्ष: भाजपची वाढ समाजवादी आणि कम्युनिस्टांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे! जयंत माईणकर

‘जर संघ फॅसिस्ट असेल तर मीसुद्धा फॅसिस्ट आहे’, १९७७ साली जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी त्या पक्षात जनसंघाच्या अंतर्भावाबद्दल पक्षाचे संस्थपक जयप्रकाश नारायण यांनी उत्तर दिलं होतं. भाजपच्या आजच्या वाढीमध्ये समाजवादी नेत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दाखविण्यास हे वाक्य पुरेसे आहे. केवळ जयप्रकाश नारायणच नव्हे तर त्याच्याआधी समाजवादी चळवळीचे अध्वर्यू डॉ राममनोहर लोहिया यांनी १९६३ च्या जोनपूर पोटनिवडणुकीत जनसंघाचे त्यावेळचे अध्यक्ष दीनदयाल उपाध्याय याना झोकून देऊन मदत केली होती. तर त्यानंतर १९६४ च्या फरुखाबादच्या निवडणुकीत तीच भूमिका दीनदयाल उपाध्याय यांनी लोहियांकरता निभावली आणि लोहियांची ही परंपरा त्यांचे पट्टशिष्य जॉर्ज फर्नांडिस, नितीशकुमार, रामविलास पासवान, चरणसिंग , अजित सिंग, देवीलाल ओमप्रकाश, अजय आणि दुष्यंत चौताला,बिजू, नवीन पटनाईक , रामकृष्ण हेगडे, जे एच पटेल आणि एच डी कुमारस्वामी यांनी अगदी आतापर्यंत निभावली आणि म्हणूनच अतिरेकी उजव्या विचारसरणीचा भाजप आज इतका मोठा झाला आहे. समाजवादी विचारसरणीशी आपली नाळ कायम ठेवून भाजपला दूर ठेवणारे समाजवादी नेते म्हणून चंद्रशेखर , पहिल्या रथयात्रेच्या कारसेवकाना रोकत बाबरी मस्जिदच संरक्षण करणारे मुलायम सिंग यादव आणि लालकृष्ण अडवणींची रथयात्रा रोखुन त्यांना अटक करणारे लालूप्रसाद यादव.अर्थात या यादीमध्ये महाराष्ट्रातील मधू दंडवते, मृणाल गोरे यांचाही नाव घेतलं पाहिजे.

कम्युनिस्ट पक्षानी सुद्धा पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे ९६ खासदार असलेल्या जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. पण यावर कडी केली १९८९ साली आलेल्या व्ही पी सिंग यांच्या सरकारने. समाजवादी आणि काँग्रेस विचारसरणीच्या लोकांचा भरणा असलेल्या जनता दलाच्या या सरकारला एकाच वेळी पाठिंबा दिला होता ८६ खासदार असलेल्या भाजप आणि ५३ खासदार असलेल्या डाव्या आघाडीने. अकरा महिने देशात अस एक सरकार होत ज्यात डाव्या, उजव्या, समाजवादी आणि काँग्रेसी विचारसरणीच्या विचारांच्या खासदारांचा समावेश होता. १९८४ ला केवळ दोन खासदार असलेल्या भाजपची ८६ पर्यंतची झेप शक्य होऊ शकली ती त्यांना मिळालेल्या समाजवादी आणि डाव्यांच्या पाठिंब्यामुळेच. १९७७ आणि १९८९ च्या प्रयोगानंतर मात्र कम्युनिस्ट भाजपपासून पूर्णपणे दूर राहिले. मात्र भाजपपासून दूर राहतानाच त्यांनी काँग्रेसपासूनही दूर राहण्याची भूमिका घेतली. आणि त्यामुळेच डाव्या पक्षांचे ६३ खासदार असताना ज्योती बसुंच्या हातातोंडाशी आलेलं देशाचं पंतप्रधानपद त्यांना त्यांच्याच पक्षाने नाकारण्यास भाग पाडले. कारण ज्या काँग्रेसला ते बंगाल, केरळ आणि त्रिपुरा या राज्यात विरोध करून सत्तेवर आले होते त्या काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधानपद मिळविणे त्यांच्या पक्षातील त्यावेळच्या तरुण प्रकाश करात आणि सिताराम येचुरी या तरुण नेतृत्वाला मान्य नव्हतं. आणि शेवटी तरुण तुर्कांचीच सरशी झाली. आणि निवडून आलेल्या कम्युनिस्ट पंतप्रधानाला पाहायला देेश मुकला. ज्योती बसुंनी या घटनेला ‘himalayan blunder ‘ म्हटलं. पुढे संयुक्त पुरोगामी आघाडीच पाहिलं सरकार हे कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्यावर आणि त्या पक्षाच्या सोमनाथ चटर्जीना लोकसभेचे सभापती पद देऊन. पण पुन्हा अमेरिकेशी आण्विक कराराच्या मुद्द्यावर कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा काढला आणि पुन्हा कम्युनिस्ट मंडळी भाजप आणि काँग्रेसपासून समान दुरी या मुद्द्यावर आले. त्यानंतर देशाच्या राजकारणातून डाव्यांचा अस्त सुरू झाला.

मागील लेखात मी ओवैसी आणि आंबेडकर हे आज भाजपला कशी मदत करत आहे हे लिहिले होते. त्याची सुरुवात स्वतः समाजवादी नेते डॉ राम मनोहर लोहियानी६०च्या दशकात जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाल उपाध्याय याना निवडून येण्यासाठी मदत करून केली होती.

समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्यांच्या कट्टर काँग्रेसविरोधी भूमिकेचा भाजपला फायदाच झाला. १९६७ साली संयुक्त विधायक दल सरकार उत्तर प्रदेशात अस्तित्वात आलंं. या सरकारमधे जनसंघाचा समावेश होता.
सत्तेतील सहभागाचा अर्थात संघ परिवाराला त्यांच्या विषारी विचारसरणीला फायदाच झाला. १९५२ साली भारतात केवळ तीन टक्के मतं आणि तीन जागा मिळविणारा जनसंघ आज भारतीय जनता पक्ष या नावानी लोकसभेतील ३०३ जागा आणि ३७.४ टक्के मतं घेऊन सत्तेवर आहे. ६८वर्षांच्या भाजपच्या या वाढीच श्रेय भाजपचा कार्यकर्ता संघ स्वयंसेवकांच्या तथाकथित कामाला आणि काँग्रेसच्या तथाकथित चुकांना देईल. पण मी एक विश्लेषक या नात्याने भाजपच्या या वाढीला अगदी गांधीहत्येपासून गोध्रा दंगलीपर्यंतच्या सर्व घटना जबाबदार आहेत हे सांगतानाच भाजपची हिंसक वृत्ती पूर्णपणे माहीत असताना केवळ काँग्रेस विरोध म्हणून भाजपला जवळ घेऊन मोठं करणाऱ्या समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसारणीलाही देईन. किंवा मी याहीपुढे जाऊन अस म्हणीन की भाजपची हिंसक आणि धार्मिक द्वेष पसरविणारी विचारसरणी ओळखून डॉ राम मनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस किंवा ज्योती बसुसारख्या कम्युनिस्ट नेत्यांनी जर या पक्षाला दूर ठेवलं असत तर हा पक्ष सत्तेवर स्वतःच्या भरवशावर सत्तेवर येण्याइतपत कधीही मोठा झाला नसता. पण डॉ लोहियांच्या अतिरेकी काँग्रेस विरोधी भूमिकेमूळे सत्तेवर येण्यासाठी त्यांनी डाव्या , उजव्या सर्वच विचारसरणीची मदत घेतली. आणि यामुळे त्यांना काही काळ जरी फायदा झाला तरी खरा फायदा मात्र पूर्ण देशावर आपल्या हिंदुत्व विचारसरणीची सत्ता आणायचं ध्येय ठेवलेल्या भाजपचा झाला आहे.

याचाच अर्थ समाजवादी आणि कम्युनिस्ट नेत्यांनी अतिरेकी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली नसती तर भाजप इतका मोठा झालाच नसता. वैचारिक दृष्टीने काँग्रेस आणि समाजवादी पक्षात समानता आहे. आणि म्हणूनच की काय अनेक समाजवादी मंडळीनी आपल्या पक्षातील लाथाळ्याना कंटाळून काँग्रेसचा आश्रय घेतला. आर्थिक मुद्द्यावर विचार केल्यास कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या धोरणात बरीच मोठी तफावत दिसेल पण सामाजिक मुद्द्यावर त्यांच्यात एकमत आहे. मी यामध्ये केवळ समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीचाच विचार करतो. प्रादेशिक अस्मितेच्या नावावर निघालेल्या पक्षांचा यात विचार करत नाही. कारण त्यांची विचारधारा राज्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे आज जरी ओवैसी , आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे भाजपला मदत होत असली तरी त्याची सुरुवात समाजवादी मंडळींनीच केली आणि कम्युनिस्टांचा त्यात थोडाफार का होईना सहभाग होताच हे विसरून चालणार नाही. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here