विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत गावठी दारूचा महापूर

0
671

विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत गावठी दारूचा महापूर

विरुर स्टे. : राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती व विक्री घडून येत आहे. जिल्ह्यात दारू बंदी असून सुद्धा बेभानपणे येथे गूळ व मोहफुलांच्या सडव्यापासून तयार झालेल्या गावठी दारूची सर्रास विक्री केली जात आहे. गावठी दारूचे बंजारागुडा हे मोठे केंद्र असून तालुक्यात सर्व परिचित असे ठिकाण आहे. मात्र पोलीस यापासून अनभिज्ञ कसे ? स्थानिक पोलीस प्रशासनाकडून यावर पडदा तर टाकण्यात येत नाही ना, अशी शंका परिसरातील नागरिकांना आहे.

शेतशिवारात झुडपांचा आधार घेऊन मोठमोठे ड्रम जमिनीत गाडून त्यात गूळ व मोहफुलांचा सडवा ठेवला जातो. त्यापासून मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करून तिचा आसपासच्या परिसरातील गावामध्ये दारूचे पार्सल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाते.

दारू बंदीच्या काळात सुद्धा हा अशाप्रकारचा दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सैराटपणे चालला असून यावर पोलीस प्रशासनाची कोणत्याच प्रकारची योग्य कारवाही होताना दिसून येत नाही. यावर होणारी कारवाई झाली असली तरी ती फक्त नाममात्र प्रकारचीच कारवाई घडून आल्यासारखी असते. आणि लगेच दोन तीन दिवसांनी दारूचे विक्रेते आणि निर्माते आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात.

विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीतील बंजारागुडा तसेच थोमापूर ही गावे गावठी दारूच्या साठ्यासाठी तालुक्यात परिचित असल्याचे दिसून येते. परिसरातील दारू पिणाऱ्या तळीरामाच्या या गावाच्या दिशेने रोज मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. या बेभान असणाऱ्या तळीरामाचा त्रास शेतातून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे कित्येक घरे उध्वस्त झाली असून विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या व्यवसायावर बंदी घालण्यासाठी शासनाकडून योग्य कार्यवाहीची प्रतीक्षा समस्त परिसरातील ग्रामस्थ करत असून या दारू पिणाऱ्या व विकणाऱ्या तळीरामाच्या दैनंदिन व्यवहारावर लगाम लावला जावा. किमान आता तरी पोलिस प्रशासनाने झोपेतून जागे होऊन कार्यवाही करावी. अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे. यावर पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here