कटाक्ष:ओवैसी -आंबेडकर, भाजपचे तारणहार! जयंत माईणकर
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन हा हैदराबाद स्थित मुस्लिम समुदायकरिता असलेला पक्ष लवकरच देशातील मुस्लिम समाजाचा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणून उदयाला आल्यास मला नवल वाटणार नाही. आणि ह्या पक्षाची ही वाटचाल होत असताना हा पक्ष भाजपला प्रकाश आंबेडकर यांच्याचप्रमाणे मदत करत आहे ही सत्य परिस्थिती आहे.

आज भारतात सात राष्ट्रीय पक्ष आहेत. पण तरीही देशातील सर्व राज्यात अस्तित्व टिकवून असलेला पक्ष केवळ काँग्रेस आहे त्याखालोखाल भाजपचा क्रमांक आहे.याव्यतिरिक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे आपल्या बंगाल, केरळ, त्रिपुरा या बालेकिल्ल्यातही अस्तित्व गमावून बसलेले पक्षही राष्ट्रीय पक्ष म्हणून गणले जातात. याव्यतिरिक्त बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या केवळ उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि बंगाल या भागात अस्तिवात असलेले हे तीन पक्ष आज राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असलेले पक्ष आहेत याला कारण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी. नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी संबंधित पक्षाला चार राज्यात किमान सहा टक्के पेक्षा जास्त मतदान झालेले असले पाहिजे. किमान एका राज्यात चार पेक्षा अधिक जागांवर लोकसभेत विजय मिळविलेला असला पाहिजे, संसदेतील एकूण जागांपैकी दोन टक्के किंवा दोन जागांवर संबंधित पक्षाचा विजय झालेला असला पाहिजे आणि या पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असली पाहिजे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या पक्षांना समान चिन्ह, फुकटात उमेदवार याद्या याचबरोबर देशातील मोठ्या शहरात कमी भावात कार्यालयासाठी जागा असे फायदे मिळतात.
मजलीस हा पक्ष आसदुद्दीन ओवैसी यांच्या आजोबांनी सुरू केला.त्यांचे वडीलही खासदार होते. पण आसदुद्दीन ओवैसी यांची महत्त्वाकांक्षा हैदराबाद च्या पलीकडे जाऊ लागली. महाराष्ट्रात त्यांनी दोन आमदार ,एक खासदार निवडून आणले तर बिहारमधील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत या पक्षाच्या २० उमेदवारांपैकी पाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुस्लिम समाजाच प्राबल्य असलेल्या बंगाल आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण उतरू ही त्यांनी घोषणा केली.आणि अर्थातच या घोषणेचा फायदा भाजपला होणार आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि आसदुद्दीन ओवैसी यांच्या मजलीस या पक्षाला भाजपची बी टिम म्हटलं जातं. आणि ती वस्तुस्थिती आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणत दलित आणि मुस्लिम समाजात स्वतः च अस्तित्व बाळगणारे हे दोन्ही पक्ष आतून भाजपलाच मदत करतात. कारण काँग्रेसकडे जाणारी दलित आणि मुस्लिम समाजाची मतं हे दोन पक्ष आपल्यात विभागून घेतात आणि मतांच्या विभाजनाचा फायदा घेऊन भाजपचा उमेदवार निवडून येण्यास मदत होते.ओवैसी आणि आंबेडकर यांना ते भाजपची बी टीम असल्याच्या प्रश्नांना अनेक वेळा तोंड द्यावं लागलं आहे. त्या प्रत्येक वेळी त्या दोघांचही उत्तर सारखच असत. दोघेही काँग्रेसवर चांगलंच तोंडसुख घेतात. आपापल्या समाजाच्या अधोगतीला ते काँग्रेसला जबाबदार ठरवतात. तुमचा खरा शत्रू भाजप की काँग्रेस याच उत्तर ते शिताफीने टाळतात.आणि सांसदीय लोकशाही पद्धतीत आपल्याला कुठेही लढण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करत आपण निवडणूक लढवतो अस उत्तर देतात मात्र यामुळे जातीयवादी पक्षाचा फायदा होतो हे सांगितल्यावर ते पुन्हा उत्तर टाळतात. आंबेडकरांचा प्रभाव महाराष्ट्रातील दलित समाजात आहे. मात्र प्रत्येक राज्यातील प्रभावी दलित नेते वेगवेगळे आहेत. आंबेडकरांना अकोला लोकसभेची जागा काँग्रेसने दोन वेळा सोडली होती आणि दोन्ही वेळी आंबेडकर निवडून आले होते.मात्र तिरंगी लढतीत नेहमी भाजपचाच विजय होत आला आहे. २०१९ च्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली असता सोलापूर, नांदेड, अकोला यासारख्या अनेक जागा काँग्रेस केवळ वंचित च्या उमेदवाराने मते खाल्ली म्हणून पडल्याचं चित्र स्पष्ट दिसत.
मुस्लिम लीग हा पक्ष क्षीण होत असतानाच ओवैसीनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. आणि आपल्या पक्षाला हैदराबादच्या बाहेर नेण्याचा चंग बांधला. आज देशातील तेलंगणा, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यात मिळून या पक्षाचे १२ आमदार आणि दोन खासदार आहेत. बिहारमध्ये ओवैसीनी आपल्या भाषणात टीका केली ती राजद आणि काँग्रेसवरच. राजदचे ११ उमेदवार एमआयएम चे उमेदवार असल्याने निवडून येऊ शकले नाहीत. याचा अर्थ जर एमआयएम बिहारमध्ये उतरली नसती तर आज राजद काँग्रेस आणि डाव्यांच सरकार बिहारमध्ये दिसलं असत. एकीकडे भाजपविरोधी पक्षांची काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच एमआयएम त्यात खीळ घालण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. भाजप वंचित आणि एमआयएम याना पैसे पुरवून उमेदवार उभे करवून घेतो असाही आरोप करण्यात आला.आज उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये जर एमआयएमने उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होईल आणि पाच राज्यातील मतांच्या भरवशावर एमआयएम राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू शकेल. वास्तविक पाहता भाजप आणि एमआयएम यांच्या विखारी प्रचारात फारसा फरक नाही. दोघांच्याही नेत्यांची भाषणे केवळ धार्मिक द्वेष पसरवीतात. आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होतो. तोटा होतो काँग्रेस प्रणित आघाडीला आणि निधर्मी जनतेला. अर्थात हे दोन्ही पक्ष ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.तेव्हा जनतेनेच या दोन पक्षांना दूर ठेवावे! तूर्तास इतकेच