मुख्य मार्गावर उभी वाहने देत आहे दुर्घटनेला आमंत्रण. वाहतुकीचा खोळंबा, पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज

0
367

मुख्य मार्गावर उभी वाहने देत आहे दुर्घटनेला आमंत्रण.
वाहतुकीचा खोळंबा, पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज

गडचांदूर:-प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर शहरवासी सध्या येथील वाहतूक व्यवस्थेमुळे कमालीचे हैराण झाले आहे.येथील मुख्य मार्गावरील अरूंद रस्त्याच्या कडेला उभी वाहने,सुसाट व वेगवान अल्पवयीन बाईकर्स तसेच बसस्थानक परिसरात काळी-पिवळी प्रवासी वाहनांचा हैदोस नागरिकांच्या जीवाला ताप बनली आहे.सर्वसामान्यांचा जीव अक्षरशा: टांगणीला लागला असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे फाटक जवळील गॅरेजमध्ये येणार्‍या विविध वाहनांनी तर कहरच केल्याचे चित्र आहे.लहान मोठी वाहने अगदी रस्त्यावरच उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याचबरोबर पेट्रोल पंप चौकापासून लखमापूर ट्रनिंगपर्यंत दोन्ही बाजूंनी उभी वाहने सुद्धा वाहतुकीस अडचण निर्माण करीत असून हे चित्र यामार्गे ये-जा करणाऱ्या पोलिसांना दिसत नसेल का ? याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.आगोदरच रेल्वे फाटक ते विर बाबूराव शेडमाके चौकापर्यंत रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि त्यावर पडलेले खड्डे,रस्याच्या कडेला उभी लहान मोठी वाहने तसेच बेलगाम झालेल्या बाईकर्समुळे महिला,पुरूष विशेषतः वृद्धांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावे लागत आहे.या समस्येला स्थानिक पोलिस प्रशासन गंभीरतेने घेताना दिसत नसून याविषयी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.मात्र असे घडताना दिसत नाही निव्वळ कारवाईचा भास दाखविला जात आहे.याठिकाणी उभ्या वाहनांनी जणू जागेचा “अमरपट्टाच बनविला कि काय” अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.उभ्या वाहनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून महामार्ग खुला करणे काळाची गरज असताना स्थानिक पोलिस प्रशासन गप्प का ? हे मात्र कोडेच बनले आहे.
गडचांदूर शहरातील मूख्य मार्गाचे गेल्या काही वर्षापूर्वी दुभाजीकरण करण्यात आल्याने सदर रस्ता अरुंद झाला.सध्याची स्थिती पाहता दोन्ही बाजूंनी उभ्या वाहनांनी रस्त्याची पुरता वाट लावली आहे.यामुळे राहदारीला मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघाताला चालना मिळत आहे.नेहमी लहान मोठे अपघात घडत असून स्थानिक नगरपरिषदेने मूख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला पादचारी रस्ता काढावा,लपलेले प्रवासी निवारे अतिक्रमण मुक्त करावे,वाहतूक नियमाची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेत पोलिसांनी रेल्वे फाटक ते वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंत रस्त्यावर उभ्या वाहनांना हटवून सदर मार्ग कायमचा खुला करावा अशी मागणी वजा विनंती येथील अनेक त्रस्त नागरीकांनी केली आहे.आता मात्र संबंधित विभाग याकडे केव्हा लक्ष देणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here