अवैध रेती नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत १६ वर्षीय युवकाचा करुण अंत

0
538

अवैध रेती नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत १६ वर्षीय युवकाचा करुण अंत

राजुरा । रेती तस्करांचा कहर तालुक्यात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच विहिरगाव येथे आज सकाळी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत सोळा वर्षीय तरुणाचा करून अंत झाल्याची घटना घडली. समस्त संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम शव उचलण्यास विरोध केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध रेती वाहतुकीने राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबासहित गावकऱ्यांनी चक्काजाम केला असून ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीला थोपविण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे रेतीघाटाचा लिलाव झाला नसल्याने अवैध रेती तस्करांकडून रेती तस्करीचा सपाटा सुरू करण्यात आला आहे.

बांधकामासाठी रेती महत्वाची असल्यामुळे या तस्करांकडून वारेवाप किमतीत रेतीची तस्करी करून पैसा कमविण्याचा गोरखधंदा निर्ढावलेल्या रेती माफियांकडून महसूल विभागाला न जुमानता सुरू आहे.

रेती घाटाच्या लिलावातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र रेती घाटाचे लॉकडाऊनमुळे लिलाव झाले नसतांनाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. यासाठी वर्धा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरु असून हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक जोमाने सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार विहीरगाव येथील शेतकरी पुंडलिक सोनुर्ले यांनी त्यांच्या मुलगा उमेश ला शेतात बॅटरीचे करंट बंद करण्याकरिता सकाळी ६.३० च्या दरम्यान सायकलने पाठविले. उमेश शेताचे काम आटोपून परत येत असतांना गावाच्या सीमेवर अवैध रेती उत्खनन करून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला चिरडले. यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ७ च्या दरम्यान हि घटना घडली. मृतकाचे नाव उमेश वय १६ असून तो ११ वी चा विद्यार्थी होता.

अपघात होताच ट्रॅक्टर चालक व मजदुर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी टाहो फोडला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी विहीरगाव येथे चक्काजाम केला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टर वर नंबरची नोंद नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले असून परिसरात चौकशी करत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. परिसरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे नागरिकांनी संयम ठेवावा अशी विनंती केली. दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here