गोष्ट एका विलक्षण असामान्य अश्या चित्तथरारक शौर्याची!

0
481

गोष्ट एका विलक्षण असामान्य अश्या चित्तथरारक शौर्याची!

सोबत जाणून घ्या – माडिया गोंड समाजाचे नाव साता समुद्रापार नेणारा ‘सामा वेलादी’ कोण?

गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील ‘जॉर्जपेठा’ गावास त्याचे हे नाव कसे मिळाले? 

संशोधन व लेखन: अमित भगत


अंगावर अक्षरश: काटा आणेल अशी ही वास्तवकथा आहे गडचिरोलीच्या अतिदुर्गम व घनदाट जंगलातील; जी त्या गर्द निबिड अरण्यातच अश्याप्रकारे गुडूप झाली होती की तिचा मागमूसही मागे राहिला नव्हता. ही रोमहर्षक कथा आम्ही अथक प्रयत्नांनी तब्बल १०० वर्षे जून्या ब्रिटिश कागदपत्रांचा धांडोळा घेत पुन्हा नव्याने शोधून काढली.

९ नोव्हेंबर १९२४ घडलेला हा रोमहर्षक प्रसंग. त्यावेळेच्या दक्षिण चांदाचे (सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याचे) उपवनसंरक्षक एच.एस. जॉर्ज (IFS) बेजुरपल्ली पासून जवळपास १५ किमी अंतरावरील पारसेवाडा गावी जंगल सर्वेक्षणाकरिता निघाले होते. हे अंतर १५ किमी असले तरीही तिकडे जाणारी वाट निबिड अश्या घनदाट अरण्यातून जात होती; आणि त्याकाळी या जंगलात वाघ, बिबट व अस्वल यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचा स्वैर वावर होता. त्यामुळे बेजुरपल्लीजवळील मुडेवाही गावातील एक माडिया गोंड आदिवासी त्यांनी वाटाड्या म्हणून सोबतीला घेतला. त्याचे नाव होते – सामा वेलादी.

किर्र भयाण जंगलाच्या त्या वाटेवर, तिथे जवळच दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने निमिषार्धातच जॉर्जवर मागून झडप घातली. वाघाने जॉर्जच्या गळ्यास करकचून पकडले होते, त्याच्या धारदार नख्या व प्राणघातक तीक्ष्ण दात जॉर्जच्या मानेच्या मांसल भागास छेदून खोलवर रुतले होते. वाघाने आपल्या बळकट बाहूंनी जॉर्जला आपल्या कवेत धरून जवळपास डझन यार्डपर्यंत फरफटत नेले होते. रक्ताच्या थारोळ्यात शुद्ध हरपून निपचित पडलेल्या जॉर्जच्या मदतीस सामा देवदूतासारखा धावून आला.

आपला जीव पणाला लावून सामा त्या नरभक्षक वाघाशी झुंज देऊ लागला. जॉर्जकडील बंदुकीचा सेफ्टी लॉक कसा काढायचा हे माहित नसल्याने सामाने बंदूक उलट फिरवून त्याच्या दस्त्याने वाघाच्या डोक्यात जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो वाघ अधिकच चवताळून गगनभेदी अश्या भीषण डरकाळ्या फोडू लागला. तरीही मागे न हटता जीवाची बाजी लावून सामाने वाघाला शेवटी तेथून पळवून लावले, व जॉर्जला खांद्यावर घेऊन तो ४ किमी धावत आपल्या गावी घेऊन आला. तिथे प्रथोमोपचार केल्यावर तातडीने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये जॉर्जला नेण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून मृत्यूच्या जबड्यात सापडूनही जॉर्जचे प्राण वाचले. देवदूतासारखा वेळेवर धावून येऊन, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले प्राण वाचविणाऱ्या सामाबद्दलची कृतज्ञता जॉर्जने पुढे मध्यप्रांताचा सर्वोच्च वनाधिकारी म्हणजेच मुख्यवनसंरक्षक झाल्यावर मुडेवाहीजवळच एक नवीन गाव वसवून व्यक्त केली. त्या गावास आज जॉर्जच्या नावाने ओळखले जाते. ते गाव म्हणजे आजच्या गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील ‘जॉर्जपेठा’.

एच. एस. जॉर्ज या ब्रिटिश अधिका-याचे प्राण वाचविण्याच्या असाधारण शौर्यक्रमाबद्दल ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज यांनी सामा वेलादी यास अल्बर्ट पदक जाहीर केले. “अल्बर्ट मेडल फॉर लाइफसेव्हिंग’ हे ब्रिटीश पदक अश्या नागरिकांना दिला जात असे ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. युद्धभूमीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी दाखविलेल्या असामान्य शौर्याबद्दलचा हा प्रमुख पुरस्कार होता. ७ मार्च १८६६ रोजी सर्वप्रथम याची स्थापना केली गेली आणि १९७१ मध्ये तो बंद करण्यात आला. हे पदक १४ डिसेंबर १८६१ रोजी निधन झालेल्या ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाचे पती व प्रिन्स अल्बर्ट यांच्या नावे सुरु करण्यात आले होते. हा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार प्राप्त करणारा सामा वेलादी हा एकमेव भारतीय आदिवासी आणि एकमेव मध्य प्रांताचा रहिवासी होता.

सामाला या पुरस्कारासोबत ४५ एकर जमीन बहाल करणारी सरकारी सनद, बैलजोडी, चांदीचा कमरपट्टा, त्याच्या शौर्याचे अंकन केलेला चांदीचा बाजूबंद आणि रोख बक्षीस मिळाले. हा पुरस्कार घेण्यासाठी तो लंडनला जाऊ शकला नाही, म्हणूनच त्याला जिल्ह्याच्या मुख्यालयी चंद्रपूर येथे बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. जेव्हा राज्यपाल सर फ्रॅंक स्ली यांनी त्याला अल्बर्ट पदकाने सन्मानित करायचे ठरवले तेंव्हा सामा केवळ एक लंगोट परिधान करून होता म्हणून त्याच्या छातीला तो मेडल लावता न आल्याने तो त्याच्या हाती सुपूर्त करण्यात आला.

सामाच्या परिवाराच्या बाबतीत आजची शोकांतिका ही आहे की ४५ एकरापैकी २० एकराची सुपीक गाळाची जमीन ही प्राणहिता नदीच्या पूरात दरम्यानच्या काळात वाहून गेली. त्या मोबदल्यात पर्यायी जमीन देण्यास शासकीय अधिकाऱ्यांनी नकार दिला. या सत्यकथेचा नायक सामा वेलादी हा १९६८ मध्ये मरण पावला. तरीही त्याच्या हक्कासाठी त्याच्या परिवाराचा संघर्ष आजही चालूच आहे. सामाचा नातू लिंगा वेलादी हा मुडेवाही गावचा सरपंच आहे. जेंव्हा त्याने आपल्या हक्कासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली व पुरावा म्हणून ब्रिटिशांनी दिलेली सनद दाखवली, तर अधिकाऱ्यांनी त्याची निर्भत्सना करून ब्रिटीशांकडून ती जमीन घेण्यास सांगितले. सामाच्या अलौकिक शौर्याची दखल शासनदरबारी घेतली जाऊन त्याच्या परिवारास त्यांचा न्यायिक हक्क मिळावा यासाठी सामाजिक पातळीवर संघटितपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे. तत्सबंधीने जनजागृती करण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here