येत्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात सोलापूर येथे प्रदान केले जाणार पुरस्कार.

0
504

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

येत्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात सोलापूर येथे प्रदान केले जाणार पुरस्कार.

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार आदरणीय मारुती चितमपल्ली यांना

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार आदरणीय मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील श्री. उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकार अचलपूर व श्री. किरण मोरे, अमरावती यांना विभागून देण्यात आला आहे आणि पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील श्री. सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, पक्षिमित्र पक्षी संवर्धन-सुश्रुषा पुरस्कार व पक्षी संशोधन पुरस्कार व पक्षी जनजागृती पुरस्कार असे चार पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असतात. या पुरस्कारांचे वितरण पुढील 3४ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तथा पर्यावरण लेखक मा. श्री. मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. दुसरा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत पक्षिमित्र सभासद, तथा चातक संस्थेसोबत कार्यरत असलेले पक्षिमित्र श्री. उदय सुभाष चौधरी जि. जळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे मेमोरिअल फंड तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

यावर्षीचा तिसरा पुरस्कार स्व. डॉ. व्ही. सी. आंबेडकर स्मृती पक्षिमित्र पक्षी संशोधन पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, प्रकाशने आणि जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत संशोधन क्षेत्रात कार्यरत सभासद डॉ . अमोल सुरेश रावणकार अचलपूर व श्री. किरण मोरे, अमरावती यांना विभागून देण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार वाईल्डलाइफ हेरीटेज कन्झर्वेशन सोसायटी नाशिक तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. चौथा पुरस्कार स्व. ईश्वरदयाल गौतम स्मृती पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभ्यास आदी क्षेत्रात कार्यरत सभासद नाशिक येथील श्री. सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी हा पुरस्कार नेस्ट संस्था (NEST), पालघर, व्दारा श्री. सचिन मेन यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये होणार असून या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here