४० लक्ष निधीतून होणार लालखडी, रहेमत नगर येथील कब्रस्थानाचा कायापालट
अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाबजी मलिक यांचे आभार व अभिनंदन

आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नांनी वाहते विकास कामांची गंगा
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे
अमरावती : ०७ नोव्हेंबर : अमरावती विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल नागरी परिसरातील कब्रस्थान व अंत्यविधी जागेची दुरुस्ती करण्याकरिता निधीची उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणी अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकास , औकाफ , कौशल्य विकास व उद्दोजकता मंत्री नामदार नवाबजी मलिक यांना निवेदनाद्वारे केली होती . या मागणीच्या अनुषंगाने नामदार नवाबजी मलिक यांनी अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम अंतर्गत अमरावती करिता ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे . या निधीतून लालखडी व रहेमत नगर येथील कब्रस्थान दुरुस्ती व अन्य मूलभूत सुविधांकरिता आ. सौ सुलभाताई खोडके यांनी केले प्रयत्न फळास आले असून सदर मागणीवर तत्काळ कार्यवाही करून पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार महोदयांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाबजी मलिक यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे .
अमरावतीमधील अल्पसंख्यांक बहुल नागरी भागातील मुस्लिम स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने तसेच अन्य पायाभूत सुविधाही मुस्लिम कब्रस्थानात उपलब्ध नसल्याने स्थानिक बांधवांना अंत्यविधी करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता . अमरावती विधानसभा क्षेत्रातील लालखडी , रहेमत नगर , या भागातील मुस्लिम समाजबांधवांची बहूप्रतिक्षीत मागणी लक्षात घेता आमदार महोदयांच्या वतीने स्थानिकांशी चर्चा करीत त्यांना अपेक्षित पायाभूत सुविधांच्या पूर्ततेला घेऊन संवाद साधण्यात आला होता .
या दरम्यान लालखडी येथील मुस्लिम कब्रस्थान दुरुस्ती करणे तसेच हायमास्ट लाईट बसविणे , रेहमत नगर येथील मुस्लिम कब्रस्थान दुरुस्ती करणे तसेच हायमास्ट लाईट बसविणे , आदि बाबींची पूर्तता व्हावी अशी स्थानिकांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेता आ. सौ.सुलभाताई खोडके यांच्या वतीने अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी पर्याप्त अनुदान वितरित करण्यात यावेत, या आशयाचे निवेदन करणारे पत्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास , औकाफ , कौशल्य विकास व उद्दोजकता मंत्री नामदार नवाबजी मलिक यांना देण्यात आले. या मागणीच्या अनुषंगाने राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्याकरिता अनुदान वितरित करण्यास अल्पसंख्यांक विकास विभागाने मंजुरी दिली आहे.
या शासन निर्णयान्वे अमरावती विधानसभा मतदार संघातील लालखडी येथील मुस्लिम कब्रस्थान दुरुस्ती करणे व हायमास्ट लाइट बसविणे , तसेच रेहमात नगर येथील मुस्लिम कब्रस्थान दुरुस्ती करणे व हायमास्ट लाइट बसविणे , या दोन विकास कामांकरिता ४० लक्ष इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत प्रत्येकी २० लक्ष निधीतून सदरची विकासकामे करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी शहरी भागात महानगर पालिकेला अंदाजपत्रक व बांधकाम आदी कामकाज करण्याची तरतूद शासन निर्णयाप्रमाणे आहे. परंतु सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात अमरावती जिल्ह्यात मंजूर झालेले विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे मार्फत करण्याची मागणी सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली होती. याबाबत अल्पसंख्यांक विकास विभागाने शासन निर्णय जारी करून सदर विकास कामे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या मार्फत करण्यासही शासन मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच लालखडी व रहेमत नगर येथील स्मशानभूमीचे दुरुस्तीच्या कामांचा कार्यारंभ होणार आहे. आपल्या निवेदनात आ. सुलभाताई खोडके यांनी बिच्छू टेकडी व वडाळी येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दुरुस्ती करण्यासाठी अनुक्रमे २० – २० लक्ष निधीची मागणी सुद्धा केली होती. यासंदर्भातही नामदार नवाबजी मलिक यांच्याशी चर्चा केली असता आगामी काळात बिच्छू टेकडी व वडाळी येथील मुस्लिम कब्रस्थान दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांच्या वतीने आ. सुलभाताई खोडके यांना देण्यात आले.