पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

0
382

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

आचारसंहिता अंमलबजावणीबाबत दिले निर्देश

चंद्रपूर, दि. 4: भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक- 2020 चा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज नियोजन सभागृहात बैठक घेवून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने तात्काळ प्रभावासह आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदर्श आचारसंहिता कालावधीत नवीन योजनांची घोषणा न करणे, शासकीय संदेश प्रणालीवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढून टाकणे, नवीन निविदा प्रक्रीया न करणे, नवीन कामांना तांत्रीक मंजूरीची शिफारस न करणे, शासकीय वाहनाचा प्रचारासाठी वापर न करण्याबाबत, राजकीय पदाधिकाऱ्यांकडील शासकीय वाहन शासनजमा करून घेणे, कोणतेही उद्घाटन, भूमिपूजन सोहळा आयोजित न करणे यासह इतर महत्वपुर्ण बाबीवर आचारसंहिता कालावधीत काय करावे व काय करू नये यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यात 36 मुख्य मतदान केंद्र तर 14 सहाय्यक मतदान केंद्र असे एकूण 50 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत पदवीधर मतदारांची एकूण संख्या 32 हजार 89 इतकी आहे. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया 7 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी निवडणूक आयोगाच्या दिनांक 26 डिसेंबर 2016 परिपत्रकात नमूद बाबींचे पालन करण्याबाबत सांगितले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा.च. कांबळे, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता क.सं सोनेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.ए.गबाळे कनिष्ठ अभियंता डी.एन.कामडी, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एम.एस पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता पि.टी. जिवतोडे तसेच महानगरपालीका, आरोग्य व पोलीस विभागासह इतर संबंधीत कार्यालयाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here