2 कोटी 20 लक्ष रुपयांतून शहरात 2 योगा भवन तर 10 योगा शेड तयार करणार – आ. किशोर जोरगेवार

0
55

2 कोटी 20 लक्ष रुपयांतून शहरात 2 योगा भवन तर 10 योगा शेड तयार करणार – आ. किशोर जोरगेवार

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, योग दिनी घोषणा

योग हा केवळ व्यायाम किंवा तंदुरुस्तीचा कार्यक्रम नाही, तर तो शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधण्याचे एक माध्यम असून योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची अत्यंत मौल्यवान देणगी आहे. ही टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. योगचे फायदे आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. योगासाठी येणाऱ्यांना सोयी-सुविधायुक्त हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आम्ही शहरात 2 योगा भवन आणि 10 योगा शेड तयार करणार आहोत. याकरिता 2 कोटी 20 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय योग दिनी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आणि योग नृत्य परिवार ट्रस्टच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवार, उपायुक्त मंगेश खवले, रोषण चड्डा, गोपाल मुंधडा, शिवम मुंधडा, राधिका मुंधडा, रुपेश राठी, सुरेश घोडगे, किशोरी इरुडकर, पारुल भारतध्वाज आदींची उपस्थिती होती. तर पतंजली योग समिती तथा ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ येथे आयोजित कार्यक्रमाला विजय चंदावार, अशोक संगीडवार, महादेव पिंपळकर, शिवशंकर घुगुल, प्रभाकर गट्टूवार, संभाशिव आगलावे, रवी इंगोले, रमेश ददगाल आदींची उपस्थिती होती. परिवर्तन योगा फाउंडेशनच्या वतीने तुकुम येथे योग दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. अशोक वासलवार, डॉ. अमित ढवस, डॉ. विनोद मुसळे, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुरेश पचारे, शिला चौव्हाण, पूरशोत्तम सहारे, रामपाल सिंग, रवि गुरनुले, शितल गुरनुले, शशिकांत मस्के, नितेश मल्लेलवार, नाना गरमडे, नरेंद्र निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, योगच्या विविध आसनांमुळे शरीरातील प्रत्येक अवयवांची तंदुरुस्ती टिकून राहते. हे आसन शरीराला लवचिक आणि मजबूत बनवतात. तसेच, नियमित योगासने केल्यामुळे हृदय, पचन, श्वसन आणि स्नायू यांचे आरोग्य सुधारते. योगाचे ध्यान आणि प्राणायाम हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता कमी होते. प्राणायामामुळे श्वसन तंत्र सुधारते, ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. योगाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाची ओळख होते. योग आत्मचिंतन आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी मदत करतो. योगाचे अनुयायी शांती, संतोष आणि आनंदाचा अनुभव घेतात, असेही ते यावेळी म्हणाले.
योग समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतो. योगाच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांशी जोडले जाते. त्यामुळे समाजातील एकता आणि बंधुभाव वाढतो. चंद्रपूरात विविध योग समितीच्या वतीने उत्तम काम केले जात आहे. हे एक ईश्वरीय कार्य आपल्या हातून घडत आहे. योगाचे लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असून त्याची पूर्तता आपल्या माध्यमातून होत असल्याचा आनंद असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. माता महाकाली महोत्सवातही योग ग्रुपचा सक्रीय सहभाग राहिला आहे. यंदा ही आपल्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी योगाचे विविध आसनांचे प्रात्यक्षिक, ध्यान आणि प्राणायामाचे तंत्र यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here