कटाक्ष: एकनाथ खडसे!संघ परिवारातील ब्राम्हणशाहीचा बळी! जयंत माईणकर

0
883

कटाक्ष: एकनाथ खडसे!संघ परिवारातील ब्राम्हणशाहीचा बळी! जयंत माईणकर

एकनाथ खडसे संघ परिवारातील ब्राम्हणशाहीचा बळी ठरले आहेत. खडसेंनी त्यांच्या गच्छंतीला केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचं म्हटलं आणि या त्यांच्या शब्दातच सार दडलेले आहे.

संघ परिवारात सरसंघचालक हे सर्वोच्च पद आहे. या पदावर आरूढ होणारे मोहन भागवत ही सहावी व्यक्ती आहे. हेडगेवार, गोळवलकर, देवरस आणि भागवत हे चारही मराठी भाषिक ब्राम्हण तर
सुदर्शन कानडी ब्राम्हण. राजेंद्र सिंग उर्फ रज्जूभय्या हे मात्र ठाकूर. जगभर पसरलेल्या १०० कोटीहून जास्त आणि संख्येने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या हिंदू धर्माची संघटना असा दावा करणाऱ्या संघ परिवाराचे सहापैकी पाच सर्वोच्च नेते हे या धर्माच्या लोकसंख्येच्या केवळ पाच टक्के असलेल्या ब्राम्हण समाजातील आहेत. संघ परिवारात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या कार्य समितीत असणाऱ्या २० ते २५ जणांच्या नावांकडे नजर टाकली तर आजही यादीतील ब्राह्मणी वर्चस्व दिसून पडत तर पूर्ण वेळ प्रचारकांमध्येही ब्राम्हण समाजाचाच भरणा आढळतो.

संघ परिवारात अगदी शाखेपासून ते सर्वोच्च पातळीपर्यंत कार्यवाह हे पद असत.आणि या पदावर असणार्या व्यक्तीकडेच सर्व कार्यभार असतो आणि हे पद ब्राम्हण व्यक्तीकडेच असतं. हिंदी बेल्ट मधील ब्राम्हण आणि बनिया समाज हाच जनसंघाचा किंवा भाजपचा खरा जुना मतदार. आपला हा मर्यादित मतदारसंघ वाढविण्यासाठी राम मंदिर यासारख्या आंदोलनात आणि भाजपमध्येसुद्धा मधल्या दर्जाच्या पदांवर किंवा कधी कधी चक्क अध्यक्ष पदावर टिळा लावण्यापूरता इतर मागासवर्गीय समाजातील लोकांचा समावेश करण्यात येऊ लागला. आणि ही गोष्ट जाणीवपूर्वक पत्रकारांना सांगितली जाऊ लागली. पण सूत्र मात्र ब्राम्हण व्यक्तींच्याच हाती राहिली.

महाराष्ट्र भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, सूर्यभान वहाडणे पाटील आणि ना स फरांदे अशा वंजारी, धनगर, मराठा आणि माळी समाजातील नेतृत्वाची फळी समोर दाखवयाला ठेवली असली तरीही पक्षाची खरी सूत्रे स्व. प्रमोद महाजनांच्याच हातात होती. आणि मुंडे हे महाजनांचे मेहुणे असल्यामुळेच पक्षात बराच काळ प्रभावी राहू शकले होते. पण त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या चार वर्षात या ब्राम्हणशाहीचा फटका बसला आणि राजकारणात त्यांच्याहुन दहा वर्षे कनिष्ठ असलेल्या गडकरींना राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले पाहावे लागले. त्यांनाही हा अपमान जिव्हारी झोंबला होता. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाऊन केंद्रात मंत्रिपद घेणार हे जवळपास नक्की झालं होत. पण मुख्यमंत्री पद तुम्हालाच मिळेल या आश्वासनामुळे असेल काँग्रेसचं दार ठोठावून आलेले मुंडे आपल्या मुलीसह भाजपमध्येच राहिले. त्यांच्या अकाली निधनानंतर विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार म्हणून मुख्यमंत्री पदावर अर्थात इतर मागासवर्गीय समाजात मोडणारे एकनाथ खडसेंचाच दावा असताना त्यांना विधिमंडळात दहा वर्षे कनिष्ठ असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना संघ परिवाराने झुकतं माप दिलं याला कारण त्यांची जात. संघ परिवाराला त्यांच्या जागी नितीन गडकरींना बसवणं आवडलं असत पण त्यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध होता. आणि म्हणून मोदींनी समर्थन दिलेल्या फडणवीसांना संघाने शिरोधार्ह केले पण खडसे मात्र धुमसत राहिले. अखेर २०१६ भ्रष्टाचाराचे थातुरमातुर आरोप समोर करून त्यांचा राजीनामा घेण्यात आला.

ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बाबरी मस्जिद विध्वंसाची घटना घडली ते कल्याणसिंगसुद्धा इतर मागास वर्गात मोडणारे. कुसुम राय या भाजपच्या महिला नेत्याबरोबरचे त्यांच्या तथाकथित संबंधांना प्रमाणाबाहेर महत्त्व देऊन त्याना मुख्यमंत्री पद सोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्यांच्या जागी रामप्रकाश गुप्त (बनिया) राजनाथसिंग(ठाकूर) यांची वर्णी लावली. यामुळे भाजप उत्तर प्रदेशात पंधरा वर्षे सत्तेपासून दूर राहिला. योगी हे ठाकूर आहेत. तिकडे मध्य प्रदेशात प्रथम उमा भारती आणि नंतर बाबूलाल गौर या अनुक्रमे लोधी आणि यादव या मागासवर्गीय समाजाचे.त्यांना मुख्यमंत्री पदावर एक वर्षाहून कमी काळ ठेवलं गेलं आणि अखेर शिवराजसिंह चौहान या राजपूत व्यक्तीची वर्णी लावली गेली.

बंगारु लक्ष्मण या आंध्र प्रदेशातील दलित नेत्याला या जातीयवादाचा फटका चांगलाच बसला. तहलका प्रकरणात एक लाख रुपये ‘पक्षनिधी’ म्हणून स्वीकारणार्या या तत्कालीन पक्षाध्यक्षाना चक्क जेलची हवा खावी लागली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा गो वैद्य त्यांना नापास झालेले स्वयंसेवक म्हणाले. त्यांचं राजकीय जीवन संपलं. त्यांचा बळी हा भाजपमधील दक्षिणेतील नेत्यांच्या आपसातील स्पर्धेत गेला अस म्हटलं गेलं.त्यामागे त्यावेळी पक्षाचे जनरल सेक्रेटरी असलेल्या वेंकय्या नायडू असल्याचाही संशय व्यक्त केला गेला. आजचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मात्र बंगारु लक्ष्मण याना या प्रकरणात पाठिंबा दिला होता.

 

ब्राम्हणेतरांसाठी आणि त्यातही इतर मागासवर्गीय आणि दलित समाजाविषयी असा दुजाभाव असणाऱ्या या संघटनेत तेली समाजाचे मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोचले त्याला कारण गोध्रा दंगल. या दंगलीमुळे त्यांची हिंदू मसीहा ही प्रतिमा बनली. आणि या प्रतिमेनंतर त्यांना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान पदावरून हटवणे वाजपेयी, भागवत कोणालाही शक्य नव्हतं.एक प्रकारे गोध्रा दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी जबरदस्तीने आपल्या पदरात पंतप्रधानपद पाडून घेतल.

हा सगळा इतिहास एवढ्याचसाठी की केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या मार्ग निर्वेध असावा म्हणून एकनाथ खडसे यांच्या मुलीला आणि सुनेला उमेदवारी देऊन त्याचबरोबर विनयभंगाचे खोटे आरोप खडसेंवरही लावले गेले.१९९९ साली सुरक्षित अशा ब्राह्मणी पश्चिम नागपूर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले विनोद गुडधे पाटील या इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला डावलुन देवेन्द्र फडणवीस यांची वर्णी लावली गेली. संघ परिवारातील या विदारक ब्राम्हण शाहीची दखल दलित आणि इतर मागासवर्गीय घेतील ही अपेक्षा! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here