बंदच्या दिवशी राजुरा शहरात खुलेआम दारू विक्री

0
141

बंदच्या दिवशी राजुरा शहरात खुलेआम दारू विक्री


राजुरा प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभाग तथा राजुरा पोलिसांच्या आशीर्वादाने कार्तिकी एकादशीला बंद च्या दिवशी राजुरा शहर व ग्रामीण भागात खुलेआम दारूची विक्री झाल्याने अक्षरशः दारूचा महापूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

राजुरा शहरातील व ग्रामीण भागात असलेली देशी दारू दुकाने, बियर बार, बियर शॉपी कार्तिकी एकादशी च्या निमित्याने बंद ठेवण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यामुळे या आदेशाची सूचना राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांनी संबधित सर्व दुकानदारांना दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पाठविले होते. परंतु राजुरा शहर व परिसरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारावर या आदेशाचा काहीच परिणाम झाला नाही. दोन तीन बियर बार वगळता इतरांनी दिनांक २३ नोव्हेंबरलाच दारूच्या पेट्या आपल्या हस्तकांना पुरविल्या. एवढ्यावरच न थांबता अगदी बंदच्या दिवशी म्हणजेच दिनांक २४ रोजी दुकानांची मागची दारे उघडी ठेवून आपल्या हस्तकामार्फत दारूची विक्री करून शासनाच्या आदेशाची अवहेलना केली.

दारू बंद चा आदेश असताना सुद्धा अवैधरीत्या दारूची विक्री झाल्याने पांडुरंग भक्तांना तळीरामाच्या त्रासाला बळी पडावे लागले. राजुरा शहरातील आझाद चौक, नाका नंबर ३, चूं ना भट्टी, कर्नल चौक, गडचांदूर रोड, चुनाळा, रामपुर, हनुमान वॉर्ड इत्यादी ठिकाणी अवैध दारूची जोरात विक्री झाल्याने समजते. यापूर्वी याच दारू विक्रेत्यानी दोन ऑक्टोंबर बंदच्या दिवशी जयंती निमित्याने महात्मा गांधी यांना श्रद्धांजली देण्याचा प्रकार उघड्या डोळ्यांनी सर्वांना बघायला मिळाला होता.

राजुरा येथील राज्य उत्पादन शुल्क तसेच राजुरा पोलिसांचे दारू विक्रेत्यांशी मधुर संबंध असून ते या दोन्ही विभागाला हप्ते पुरवितात का..? त्यामुळे बंदच्या दिवशी दारू विकताना दुकानदारांच्या हस्तकांना कुठलीही भीती वाटत नाही. दोन्ही विभागाच्या आशीर्वाद प्राप्त असल्याने दारू विक्रीला उधाण आल्याचे चित्र आहे.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आठवड्याच्या सात ही दिवस बंद असल्याने नेमकी तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. रमाबाई वॉर्ड राजुरा येथे समोरा समोर दोन दोन अवैद्य दुकाने थाटली आहे. त्यामुळे अनेकदा गँग वार सारखे प्रकार घडले आहेत. तरी सुद्धा पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या प्रकरणावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधीक्षक राज्य उत्पादन विभाग यांनी वेळीच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. बंदच्या दिवशी दारू विक्रीचे प्रकार बंद न केल्यास या विरुद्ध आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काही सामाजिक संघटनानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here