कोरोना जनजागृती काव्यधारा – २

0
366

कोरोना जनजागृती काव्यधारा – २

कवी – प्रदिप देशमुख चंद्रपुर

 

माझी जबाबदारी

हा कोण काळ आला झाली हवा विषारी
माझे कुटुंब आहे माझी जबाबदारी ।।धृ।।

सांभाळतात पक्षी घरट्यातल्या पिलांना
देईन मी सुरक्षा तैसीच लेकरांना
बसला टपून आहे अदृश्य तो शिकारी ।१।

फिरतो उगाच मित्रा बाहेर तू कशाला
झाकून घे मुखाला बांधून एक शेला
‘त्याच्या’पुढे कुणाची चाले इजारदारी ? ।२।

दारात एक साबण पाणी भरून ठेवू
आधी करू सफाई तेव्हा घरात येवू
ही स्वच्छताच अपुले आयुष्य आज तारी ।३।

संपर्क थेट टाळा ठेवा जरा विवेका
आता नकोच भेटी बिलगून एकमेका
दोघांत ‘दो गजांची’ ठेवा सदैव दूरी ।४।

शरीरात ताप नाही मोजून हे बघावे
रक्तात प्राणवायू आहे किती कळावे
वरदान दोन यंत्रे शस्रे जणू दुधारी ।५।

व्यायाम ही पुरेसा, आहार योग्य घ्यावा
कोवीड रोखण्याला शरिरास सज्ज ठेवा
होऊ व्रतस्थ आता दावू इमानदारी ।६।
माझे कुटुंब आहे माझी जबाबदारी

– प्रदीप देशमुख, चंद्रपूर
संपर्क – 9421814627

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here