कोंबडा बाजारावर दुसऱ्यांदा पोलिसांची धाड, कोंबडेबाजांचे पलायन…

0
1279

कोंबडा बाजारावर दुसऱ्यांदा पोलिसांची धाड, कोंबडेबाजांचे पलायन…

विरुर स्टे./राजुरा, २० मार्च : गेल्या दीड दोन महिनाभरापासून विरूर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत अवैध कोंबड्याच्या झुंजी लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याचा गैरप्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाखाच्या घरात पैजी लावण्यात येत असून हौशिंची मोठी चंबळ दिसून येत असताना स्थानिक पोलीस यंत्रणेला या कोंबडेबाजांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

विरुर पोलीस ठाणे हद्दीत आठवड्यातून दोन ते तीन दिवस कोंबडा झुंजीचे आयोजन करण्यात येत. ठिकठिकाणच्या हौशिंना कोंबडेबाज आयोजकांकडून याची माहिती देण्यात येते. दुचाकीने कोंबडे घेऊन याठिकाणी येणाऱ्याकडून कोंबडा झुंजी व सट्टा लावला जातो. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. या ठिकाणी ७ मार्च व १९ मार्च ला दोनदा पोलिसांनी धाड टाकली. मात्र ऐन वेळेवर सदर कोंबडेबाज आयोजकांना पोलीस यंत्रणा छापा मारणार अशी माहिती मिळाल्याने याठिकाणी येणाऱ्या कोंबडा झुंजी हौशींना पलायन करण्यास सांगण्यात आले व पूर्ण सारवासारव करण्यात आली. यामुळे पोलीस यंत्रणा हतबल ठरत असल्याने कोंबडेबाज आयोजकांचे सक्रिय नेटवर्क मोठे आवाहन ठरत आहे का…? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दीड दोन महिनाभरापासून विरूर पोलीस ठाणे हद्दीत कोंबड्याच्या झुंजी लावण्यात येत असून सुद्धा यावर कारवाई होत नसल्याने सुजाण नागरिकांना यक्ष प्रश्न पडला आहे. यात हवशे गवशे नवशे येताना दिसून आहेत. सदर कोंबडा झुंजी भरवणाऱ्या आयोजकांचे जाळे भरभक्कम असून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतचे राज्य तेलंगाणातील ही कोंबडा झुंजीचे हौशी मोठ्या संख्येने येत असून मोठ्या प्रमाणात पैजी लावण्यात येत असल्याची माहिती आहे. यात मोठी आर्थिक उलाढाल होते. यात तरुण-युवक ओढल्या जात आहेत. शिवाय नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींकडून मोठमोठ्या पैजी लावण्यात येत असल्याने आर्थिक नुकसान होताना दिसून येत आहे. मात्र पोलीस यंत्रणा दोनदा छापा मारून हाती काहीच न लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दर आठवड्याला भरणाऱ्या कोंबड्या च्या झुंजीत चालणाऱ्या आर्थिक सट्टेबाजीमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडत आहेत. तर नव्याने तरुण मंडळी यात ओढली जात असल्याने आर्थिक नुकसान, मद्यप्राशन यांचे स्तोम वाढत चालले आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष घालून कोंबडा झुंजी आयोजकांच्या सक्रिय जाळ्यावर तातडीने आळा घालण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here