पवित्र दिक्षाभूमी येथे 1 लाख पुस्तकांचे संग्रह असणारी अद्यावत अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

92

पवित्र दिक्षाभूमी येथे 1 लाख पुस्तकांचे संग्रह असणारी अद्यावत अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते अभ्यासिकेच्या बांधकामाचे भुमिपूजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणुन संबोधले जाते. त्यांच्या पावण स्पर्शाने पुलित झालेल्या पवित्र दिक्षाभुमी येथे 1 कोटी रुपयातुन अभ्यासिका तयार होत आहे. या कामाचे भुमिपूजन करतांना आंनद होत आहे. मात्र यावर न थांबता येथे १ लाख पुस्तकांचे संग्रह असणारी अद्यावत अभ्यासिका तयार करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातुन दीक्षाभूमी परिसरात अभ्यासिकेच्या बांधकामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर निधीतुन तयार होणार असलेल्या अभ्यासिकेच्या कामाचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव सखारामजी पालतेलवार, सहसचिव कुणाल घोटेकर, माजी नगर सेवक पप्पू देशमुख, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. सहाजिक याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. यावेळी एक विद्यार्थी अभ्यासिकेची फी देण्याचेही आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगण्याकरीता माझ्याकडे आला. त्या दिवशी गरिब-गरजु विद्यार्थांना निःशुल्क अभ्यास करता यावा यासाठी मतदार संघात सर्व सोयी सुविधायुक्त ११ अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पुर्णत्वाकडे जात असल्याचा आज आनंद होत आहे. ११ पैकी ७ अभ्यासिकांच्या कामाला सुरवात झाली आहे. तर उर्वरित अभ्यासिकांचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शिक्षणाचे महत्व मोठे आहे. त्यामुळे आरोग्या नंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची माझी भूमिका आहे. समाजाच्या सेवेकरता माणूस घडविणार्या असंख्य अनुयायांचे श्रद्धा स्थान असलेल्या चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. निवडूण आल्या नंतर पहिल्याच अधिवेशनात दिक्षाभुमीच्या विकासासाठी एकत्रीत १०० कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी आपण केली होती. . याचा पाठपूरावाही आपल्या वतीने सातत्याने सुरु आहे. येथील विकासकामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

येथे असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाकरिता एक उत्तम अभ्यासिकेची निर्मिती करावी असा मानस होता. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरु होते. अखेर यासाठी आपण १ कोटी रुपयांचा निधी मंजुर करु शकलो याचा नक्कीच आनंद आहे. मात्र तयार होत असलेल्या अभ्यासिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचलेली, त्यांनी लिहीलेली पुस्तके आपण उपलब्ध करणार आहोत. हे पुस्तके वाचून त्यांनी दिलेला समतेचे विचार विद्यार्थांनी समाजा पर्यंत पोहचवावा अशी अपेक्षाही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्ती केली.

नागपूर नंतर चंद्रपूरातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिली. नागपूरच्या दीक्षाभुमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूरच्या दीक्षाभुमिचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे येथे विकासकार्य व्हावे यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येथे 15 आणि 16 ऑक्टोंबर येणार्या लाखो अनुयायांची उत्तम सोय झाली पाहिजे. या दिशेनेही विकास करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले. यावेळी दिक्षाभूमिच्या विकास आराखड्याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी व नागरिक यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

advt