प्रारब्ध, प्रार्थना आणि प्रयास यशाची त्रिसूत्री – आदित्य हिराणी
“प्रारब्ध, प्रार्थना आणि प्रयास या तीन वरच आपले यश अवलंबून असून प्रार्थना आणि प्रयास या गोष्टी आपल्या हातात आहेत. ज्या माध्यमातून आपण प्रारब्ध बदलवू होऊ शकतो आणि यश प्राप्त करू शकतो. आपल्यासमोर असणारी गाडी, बंगला, नोकर, चाकर हे आपले खरे यश नाही तर आपल्याला मिळालेल्या सेवेच्या पदातून आपण किती जणांच्या जीवनाला सकारात्मक प्रयान्नांनी उन्नत करू शकलो हेच खरे यशाचे मोजमाप आहे.” असे विचार मूळचे वणीचे आणि सध्या बंगाल मध्ये कार्यरत प्रशासकीय अधिकारी आदित्य विक्रम हिराणी यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित सिनर्जी या अभिनव कार्यक्रमात ” प्रशासकीय सेवेतील माझा प्रवास” या विषयावर ते उपस्थित अशी संवाद साधित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. मानस कुमार गुप्ता उपस्थित होते.
डॉ. आदित्य शेंडे यांनी वक्त्याचा परिचय करून दिल्यानंतर आपल्या शांत संयमी पण प्रभावशाली शैलीत आदित्य हिराणी यांनी त्यांच्या बालपणापासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश,अपयश इत्यादी चढउतारांचे त्यावेळी घेतलेल्या परिश्रमांचे त्यात आलेल्या अनुभवांचे आणि स्वतःला अधिक विकसित करण्याच्या प्रयासांचे सविस्तर निरूपण करताना आयुष्यात पुन्हा कदाचित कधीच न भेटणाऱ्या लोकांना देखील सहाय्य करण्याची अपूर्व संधी या सेवेत मिळते हे सांगत प्रशासकीय सेवेने अधिकार मिळाला तरी सेवेसाठी तोच एकमेव मार्ग नसून आपण हातात घेतलेल्या प्रत्येक कामातून आपण स्वतःची उन्नती आणि स्वतःच्या समाजाचा विकास करू ही भावना जोपासण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ मनोज कुमार गुप्ता यांनी विद्वान सर्वत्र पूज्यते ! हा सिद्धांत सांगत आदित्य हिराणी सारखे लोक मिळणे हे समाजाचे भाग्य आहे असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ गुलशन कुथे यांनी केले.