मुल शहरात सिमेंट रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५ कोटी २८ लाख रुपये मंजूर

0
266

मुल शहरात सिमेंट रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५ कोटी २८ लाख रुपये मंजूर

पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

बल्लारपूर मतदार संघातील मुल शहरातील अंतर्गत रस्ते मजबूत होणार असून सांडपाणी व्यवस्थापन अधिक सुरळीत होणार आहेत; याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी पुढाकार घेऊन, सतत पाठपुरावा करुन ५ कोटी २८ लाख १६ हजार ६६१ रुपये मंजूर करवून घेतले आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाकडे याबाबत ना. मुनगंटीवार यांनी मागणी केली होती; त्यानुसार बुधवारी ०१ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातून नगर विकास विभागाकडून शासनादेश निर्गमित करण्यात आले.

यासंदर्भात ना श्री मुनगंटीवार म्हणाले की,या विकासकामांच्‍या माध्‍यमातुन मुल शहराच्‍या वैभवात अधिक भर घातली जाणार आहे. या आधीही मुल शहरात सिमेंट रस्‍त्‍यांचे बांधकाम, अंतर्गत रस्‍ते व नाल्‍यांचे बांधकाम, कर्मवीर मा.सा. कन्‍नमवार यांचे स्‍मारक व सभागृहाचे बांधकाम, पं. दिनदयाल उपाध्‍याय इको पार्क चे बांधकाम, आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाची निर्मीती, शहरात पंचायत समितीची अत्‍याधुनिक इमारत, तहसिल कार्यालयाची अत्‍याधुनिक इमारत, शहरातील बसस्‍थानकाचे अत्‍याधुनिकीकरण व नुतनीकरण, शहरात 24×7 पाणी पुरवठा योजना अशी विकासकामांची मोठी मालीका आम्‍ही तयार केली आहे.

मुल शहराच्या सर्वांगीण विकासाला मी प्राधान्य देतोय ; शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरण उत्तम असावे यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापुढेही विविध विभागातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here