विविध मागण्या घेऊन भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे पोंभुर्णा येथे धरणे आंदोलन
मुख्यमंत्र्यांना दिले तहशीलदार मार्फत निवेदन

पोंभुर्णा /१४ऑक्टोबर.
भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना पोंभुर्णा च्या वतीने दिव्यांगाच्या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना (कोविड १९) च्या प्रकोपामुळे अनेक लोकांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून निराधार योजनेचे प्रलंबित हप्ते रखडले आहेत. त्यामुळे भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या मागण्या शासनाकडे पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.निवेदनात त्यांनी विविध प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.त्यात शासनाने दिव्यांग कल्याणासाठी अनेक शासन निर्णय काढलेत पण अमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. लॉकडाऊनमुळे मागील ५ ते ६ महिन्यापासून दिव्यांगाच्या प्रलंबित हप्त्यामुळे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व अन्य योजनेमध्ये ३००० रुपये प्रतिमाह देण्यात यावे. तसेच संबधित योजनेचे पेन्शन तात्काळ जमा करण्यात यावे. दिव्यांगाचे कर्ज माफ करण्यात यावे.दिव्यांगाना प्राधान्याने विनाअट घरकुल देण्यात यावे तसेच त्यांना अंत्योदय यादीत समाविष्ट करून घ्यावे. शासन निर्णयनुसार गृहकरात ५०टक्के सवलत देण्यात यावे. दिव्यांगाना ५००० रुपयाची तात्काळ मदत करावी. अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहशीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न केल्यास भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा हि निवेदनातून दिला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, तालुका अध्यक्ष रफिक कुरेशी, उपाध्यक्ष नवनाथ पिपरे, सचिव अविशांत अलगमवार, महासचिव गयाबाई भलवे, सहसचिव अरूणा अल्लीवार, कोषाध्यक्ष देविदास उराडे, वैशाली वाळके, शारदा मोगरकर, संतोष सातपुते, अनिल शेडमाके, विठ्ठल वासेकर,भिमा मानकर,राजन गुरुनुले तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बहुसंख्येने दिव्यांग उपस्थितीत होते.🔅
=================================