बनावट देशी दारू विक्रीचा अखेर पर्दाफाश

173

बनावट देशी दारू विक्रीचा अखेर पर्दाफाश

चंद्रपूर, 17 जाने. : सिंदेवाही तालुक्यातील मौजे मिनघरी (मोठी) येथे बनावट देशी दारूचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क वरोरा चे निरीक्षक विकास थोरात यांनी सदर ठिकाणी आज पहाटे अचानक छापा मारला असता उमाजी चंद्रहास झोडे या इसमाच्या ताब्यातील मारुती कंपनीची रिट्स कार या चारचाकी वाहनातून बनावट देशी मद्य 90 मिली क्षमतेच्या रॉकेट ब्रँड्स च्या एक हजार मिळाल्या. सदर छापेमारीत आरोपी इसमासह मद्य साठा व कार असा एकूण 2 लक्ष 70 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर मद्यसाठा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता आरोपीने चंद्रपूर शहरातील एका इसमाचे नाव सांगितले. त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे तपासकामी गेले असता मुख्य आरोपीस सुगावा लागल्याने तो फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट देशी दारू विक्रीच्या मुख्य सुत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून त्यामध्ये मोठे जाळे सक्रिय असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभाग विभागीय आयुक्त मोहन वर्दे, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क वरोरा निरीक्षक विकास थोरात, दुय्यम निरीक्षक संजय आक्केवार, स. दुय्यम निरीक्षक चंदन भगत, जवान उमेश जुंबाडे, किशोर पेदुजवार, सुजित चिकाटे, जवान-नि-वाहनचालक दिलदार रायपुरे यांनी पार पाडली.

सदरील गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क वरोरा निरीक्षक विकास थोरात करीत आहेत.

advt