गावातील नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा, मात्र आमदार साहेबांनी 20 लाख खर्च करून बांधली व्यायामशाळा
वंचित जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी व्यक्त केला संताप…
चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोष्टाळा गावात नागरिकांना अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकीकडे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या गावात असताना आमदार सुभाष धोटे यांनी कोणतीही नळ योजना किंवा आरो प्लांट न लावता चक्क 20 लाख रुपये खर्च करून गावात व्यायामशाळा बांधली.दरम्यान या गावात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी भेट देऊन पाहणी केली असता हे भयावह वास्तव समोर आले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कोष्टाळा गावातील लोकसंख्या ही 1200 आहे.या गावात पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर आहे.मात्र 8 ते 10 वर्षांपासून या विहिरीची साफसफाई न झाल्याने गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.त्यामुळं गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच ही विहीर नाल्यालगत असून नाल्याचे पाणी सुद्धा विहिरीत जात आहे.इतकी मोठी समस्या असताना आमदार साहेब मात्र झोपेचे सोंग घेऊन असून गावात 20 लाख रुपये खर्च करून व्यायामशाळा बांधली. मात्र गावातील मूलभूत सोयीसुविधे कडे दुर्लक्ष केल्याने गावातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.त्यामुळे गावात आरो प्लांट लावावे व विहिरीची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी वंचित जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केली आहे.तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या निधीचा ऑडिट करा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.