• मा.धनंजय साळवे • प्रयोगशील कार्यकर्ता अधिकारी

0
815

• मा.धनंजय साळवे
• प्रयोगशील कार्यकर्ता अधिकारी
•••••••••••••••••••••••••••••••••

सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

खरं तर हे वेड्या माणसांचं जग आहे. सहज कुणालाही वेडे होता येत नाही. ‘वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी लोक ते वाचतात’ असं उगीच म्हणत नाही. वेड्या माणसांना स्वतंत्र इतिहास असतो. वेडे अर्थात ध्येयवेडे. ध्येयवेड्यात प्रयोगशीलता असली की कृतियुक्त सृजनशीलतेला बहार येतो. प्रगल्भ जाणिवेतून कल्याणकारी कार्याला गती येते. मी जवळून बघितलेल्या, अनुभवलेल्या व सुगंधी सहवास लाभलेल्या ज्या मोजक्या अधिका-यामध्ये अत्यंत आदरयुक्त मा.धनंजय साळवे साहेब हे वेडे व्यक्तीमत्व मुळातच किमयागार आहे. त्यांच्यात ‘अधिकारी कम, कार्यकर्ता जादा!’ असल्याचा नेहमीच कार्यशैलीतून परिचय येतो.

मा.धनंजय साळवे साहेब पोंभुर्णा पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी आहेत. आदर्श ग्राम घाटकुळचे खरे मार्गदर्शक आणि दिशादर्शक तेच. ग्रामीण विकास आणि परिवर्तनाच्या चळवळीतील साहेब म्हणजे शिलेदारच. ते हळव्या मनाचे उत्कृष्ठ कवी, लेखक, वक्ते आहेत. जिल्ह्यातील साहित्यविषयक संस्थांचे व नव्या लिहीत्या पिढीचे ते पाठीराखे आहेत. पंचायत समीती अंतर्गत साहित्यविषयक कविसंमेलने, व्याख्याने आदी उपक्रम राबवून त्यांनी जनजागृतीचं अनोखं माध्यम हाताळलं. कर्मचा-यात आनंददायी वातावरण निर्मीतीसाठी नाविण्यपूर्ण कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव घेतले. जिल्हा परिषद शाळांच्या क्रिडा सांस्कृतिक स्पर्धेला ‘आनंदोत्सव’ हे नामकरण दिलं. लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांच्या विश्वासार्ह भुमिकेतून नव्या संकल्पनांसह पोंभुर्णा पंचायत समीतीला आय.एस.ओ नामांकन मिळवून दिलं. प्रशासकीय स्तरावर फारसे कुणी स्वत:ला त्रास करुन घेत नाहीत. आदर्श ग्राम घाटकुळ गावांसाठी सुट्टीवर असतांना देखील गावात येवून गावक-यांची ग्रामविकासात्मक बैठका व तयारी करुन घेतांना त्यांना प्रत्यक्ष अनुभवले आहे.

प्रचंड उत्साह आणि सकारात्मकता हे साळवे साहेबाचं वैशिष्ट्य. विविध क्षेत्रातील त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख तसा हिमालयासारखाच. त्यांनी वरोरा पंचायत समितीचे उपसभापती पद भुषवून राजकिय कारकिर्द देखील गाजवली. त्यांचं मुळ गाव खेमजई. अजूनही त्यांची गावाशी नाळ घट्ट आहे. गावात दरवर्षी होणा-या क्रिडास्पर्धा व सार्वजनिक भाऊबिजेच्या कार्यक्रमाचे खरे सुत्रधार साहेबच. ‘कर के देखो’ म्हणत प्रत्येकाला सतत प्रोत्साहन देणारे, सर्वतोपरी मदत करणारे ते सामाजिक हितचिंतक आहे. रक्तदान चळवळीत सक्रिय राहून वयासोबतच स्वत: रक्तदानाची पन्नाशी गाठण्याच्या ते उंबरठ्यावर आहेत.

काही माणसांचं नाव ओठावर आलं की चेहरा आनंदाने आपोआप फुलतो. त्यांच्या मार्गदर्शन व सहवासाने अधिक जोमाने व उर्जेने काम करायला उत्साह येतो. माझ्यासारख्या लोखंडाचं खरे तर साहेबांनीच परिस स्पर्शासारखं सोनं केलं. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करायला दिशा दिली. विश्वास दिला. काही माणसं खरोखरच मोठी असतात. मनाने आणि कर्तुत्वानेही. प्रतिभा त्यांचा गुणधर्म असतो. आपणास ते सुक्ष्मतेने ओळखता येणं फार महत्त्वाचं असतं. साळवे साहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा नवं जगण्याचं परिमाण गवसतं. खरे तर ते अधिकारी पेक्षा मित्र म्हणूनच भेटतात. मैत्रीला कुठे वयाचं आणि पदाचं बंधन असतं ?

साहेबांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय व राजकिय क्षेत्रात केलेलं कार्य उल्लेखनीय तितकच दखलपात्र आहे. साहेब अधिकारी म्हणून जितके मोठे तितकेच ‘माणूस’ म्हणून मोठे आहेत. सामाजिक संवेदना हरवलेल्या काळात साहेबांची तळमळ अनुभवणारा माणूस त्यांच्या प्रेमात पडतो. सतत हसतमुख, क्रियाशील राहून स्वत:चं दु:ख पचवून दुस-यांसाठी आनंदाची गाणी गाणारा, आनंद पेरणारा त्यांचा स्वभाव आपोआप भावतो.

प्रयोगशीलतेला कृतीयुक्ततेची जोड दिली की सफलतेचा मार्ग खुला होतो. साहेबांनी जी कामे हाती घेतली, ती पुर्णत्वास नेली. मी अनुभवलेलं घाटकुळ हे गाव त्याची प्रचिती देते. घाटकुळ ग्रामस्थांत साहेबांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम वेळोवेळी अनुभवला. गावाप्रती साहेबांची असलेली बांधिलकी अनुभवली. असे कार्यतत्पर अधिकारी खंबीरपणे गावक-यांच्या पाठीशी राहीले तर आदर्श गाव, स्मार्ट ग्राम सारखं कुठलंच आव्हानं कठीण वाटत नाही. मी अधिकारी पाहीलेत पण प्रयोगशील कार्यकर्ता अधिकारी म्हणून फार जवळून साळवे साहेबांना पाहीलंत. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या उंचीला आणि कार्यशैलीला सलाम !

२ आक्टोंबर हा आदरणीय साळवे साहेबांचा वाढदिवस. आज त्यांचे ५० व्या वर्षात पदार्पन. अर्थात सुवर्णमहोत्सवी सोहळा. मागील दोन वर्षांपासून साळवे साहेबांचा वाढदिवस आदर्श ग्राम घाटकुळ येथे साजरा करण्याचा आनंद आम्हास मिळाला. सुवर्णमहोत्सवी वाढदिवस शताब्दी पार होवो, या साहेबांना आनंददायी, आरोग्यवर्धक शुभकामना…!

– अविनाश पोईनकर, चंद्रपूर

•••••••••••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here