शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना परिस्थितीवर उपाययोजना : जिल्हाधिकारी 

0
489

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना परिस्थितीवर उपाययोजना : जिल्हाधिकारी 

रूग्णसंख्या वाढल्यामुळे कोरोना रणनितीत करावे लागतात बदल

चंद्रपूर,दि.27 सप्टेंबर : कोरोना संसर्गाच्या सुरूवातीला व आता कोरोना संसर्ग वाढत असतांना प्रतिबंधक उपाययोजना अवलंबतांना प्रशासनास रणनितीत काही बदल करावे लागले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच कोरोना परिस्थितीवर उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आलेले बदल:

पुर्वी एखादा रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास तो राहत असलेला संपूर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र ( कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषीत करण्यात येत होते. परंतु कोरोना रूग्ण वाढायला लागल्याने या प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या वाढायला लागली. त्यामुळे जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध येवून जनतेच्या अडचणी वाढल्या. सगळीकडेच रूग्ण आढळायला लागले. अशावेळी पुर्वीप्रमाणेच प्रतिबंध घातल्यास सर्व गाव, शहरच बंद करावी लागली असती. त्यामुळे नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार रूग्ण आढळल्यास, आवश्यकतेनुसार ते घर व परिसरातील 50 घरे प्रतिबंधीत क्षेत्र करण्याबाबत निर्देश आहेत.

पॉझिटिव्ह अहवाल येताच रूग्णाशी तात्काळ संपर्क व आता केवळ कुटूंबातील सदस्यांच्याच चाचण्या केल्या जातात असे नाही, तर पॉझिटीव्ह रूग्ण अहवाल येताच त्याचे संपर्कात आलेल्या सर्व अति जोखिम संपर्कातील प्रत्येकाची व कमी जोखिम संपर्कातील लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केल्या जाते.

पुर्वी बाहेरून आलेल्या प्रत्येकाची तपासणी केली जायची. आता लॉकडाऊन नसल्याने प्रवासास मुभा आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची  तपासणी न करता लक्षणे असणाऱ्यांचा शोध घेवून चाचणी करण्यात येते. तसेच कोविड सदृश्य आजार (आयएलआय व सारी ) असणारे व रूग्णाचे जोखिम असणाऱ्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी करण्यात येते. पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले जात नसून रूग्णाचे स्थिती नुसार त्यास आवश्यकते प्रमाणे भरती केल्या जावून उपचार केले जातात.

पॉझिटिव्ह आहे पण लक्षणे नाहीत, अशा रूग्णास कोरोना केअर सेंटर (सीसीसी) मध्ये भरती करून 10 दिवस ठेवल्या जाते व कुठलीही लक्षणे नसल्यास सुटी दिल्या जाते.त्यानंतर रूग्णास त्याचे घरीच 7 दिवस विलगीकरण करून राहणे आवश्यक आहे.

कोरोना केअर सेंटर मधील रूग्णास सौम्य लक्षणे असल्यास तेथेच उपचार केले जातात. मध्यम वा तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ कोविड रुग्णालयात पाठवून उपचार दिले जातात. कोविड रुग्णालयातही रूग्णास किमान 10 दिवस ठेवले जाते व सतत 3 दिवस कुठलीही रोग लक्षणे नसल्यास 10 दिवसानंतर सुटी दिल्या जाते. या रूग्णांनीही घरी 7 दिवस विलगीकरण करून राहणे गरजेचे आहेच.

पुर्वी संशयित रूग्णाची (पहिली) चाचणी केल्यावर रूग्णालयात भरती केल्यानंतर सुटी देण्यापुर्वी चाचणी केली जायची  व निगेटिव्ह असल्यास 24 तासांनी पुन्हा चाचणी करून निगेटिव्ह असल्यासच सुटी दिली जायची. आता रूग्णालयात भरती झालेला रूग्ण ठीक झाल्यानंतर सतत 3 दिवस लक्षणे न आढळल्यास 10 दिवसांनी सुटी दिल्या जाते.

पुर्वी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंना संस्थात्मक विलगीकरण करावे लागत होते. आता पॉझिटिव्ह रुग्णाचे कुटूंबातील, संपर्कातील अतिजोखमीचा संपर्क असल्यास त्या प्रत्येकाची किंवा कमी जोखमिचा संपर्क असलेल्या व्यक्तिस लक्षणे असल्यास चाचणी केल्या जावून आवश्यकते नुसार कोरोना केअर सेंटर, कोविड रुग्णालयात पाठविले जाते. किंवा घरी सुविधा असल्यास व लक्षणे नसल्यास होम आयसोलेशनची परवानगी दिल्या जाते.

नागरिकांना शंका असल्यास गोंधळून न जाता जिल्हा कोरोना नियंत्रण व सहायता केंद्राच्या 07172-261226, 07172-251597 किंवा  1077 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here