राजुरा तालुक्यात आरओ प्लान्ट ठरतोय ‘शो पीस’

0
360

राजुरा तालुक्यात आरओ प्लान्ट ठरतोय ‘शो पीस’

● वीज पुरवठा नसताना वाटली खैरात

● जुन्या हॅन्डपंपवरून पाइपलाइन

 

 

राजुरा : पिण्याच्या पाण्यातून जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, याकरिता गावामध्ये आरओ प्लान्ट लावण्यात येत आहे. पण सध्या तालुक्यात हेच आरओ प्लांट ‘शो पीस’ ठरू पहात आहे. वीज पुरवठा नसलेल्या गावात खैरात वाटल्याची जोरात चर्चा आहे. सोबतच काही गावातील जुन्या वापरात नसलेल्या हॅन्डपंपमधून पाइपलाइन घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.त्यामुळे जिल्हा निधीतून देण्यात आलेले आरओ प्लान्ट बुजगावणे ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अंदाजपत्रकातील दिशानिर्देशानुसार गावात प्लांटची उभारण्यात येत आहे की नाही याची चौकशी केल्यास फार मोठे घबाड समोर येऊ शकते, असे बोलले जात आहे.

 

 

तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी शुध्द मिळावे, याकरिता काही ग्रामपंचायतमध्ये आरओ प्लान्ट लावण्यात येत आहे. या आरओचे अंदाजपत्रक सात लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात आरओ प्लांट बसविण्याकरिता ग्रामपंचायतमध्ये वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. तसेच नवीन हॅन्डपंप नसेल तर बोर खोदणे गरजेचे आहे. पण सध्या वीज पुरवठा नसलेल्या गावातसुध्दा आरओ प्लॉन्टची खैरात वाटण्यात आल्याचा आरोप होत आहे. तसेच वापरात नसलेल्या जुन्या हॅन्डपंपमधून पाइपलाइन घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुळात वापरात नसलेल्या हॅन्डपंपचे पाणी दूषित रहात असल्याने पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, आरओ प्लॉन्टच्या देखभाल दुरुस्तीकरिता तांत्रिक ऑपरेटरची गरज असते. पण सध्यातरी एकाही ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक गावातील आरओ बंद पडले आहे. आरओच्या नावाखाली निधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. आरओ सयंत्र बसविण्यामागे उदात्त हेतू असला तरी खादाड व्यवस्थेमुळे पाणी योजनेला हरताळ फासला जात आहे. आरओ सयंत्र बसविण्यामागे मोठी अनियमितता असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील दिशानिर्देशानुसार आरओ प्लॉन्ट बसविण्यात आले की नाही, याची चौकशी केल्यास फार मोठे घबाड़ समोर येऊ शकते, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here