कटाक्ष:माध्यम! पाच राजकीय विचारांचा आरसा! जयंत माईणकर

0
282

कटाक्ष:माध्यम! पाच राजकीय विचारांचा आरसा! जयंत माईणकर

वृत्तपत्र किंवा माध्यम हा समाजजीवनाचा आरसा मानला जातो.समाजात सुरू असलेल्या विविध घटनांचा वृत्तांत त्यावरील भाष्य माध्यमातून प्रकट केले जातात. जगातील चारही दिशांनी (North, east, west south= News) लोकांना आकर्षित करणाऱ्या घटनेला न्यूज किंवा बातमी म्हणतात. पत्रकारितेचा पहिला धडा आहे, कुत्रा माणसाला चावला ही बातमी नव्हे तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी. म्हणजेच नेहमीपेक्षा वेगळं घडलं ती बातमी. प्रत्येक बातमीकडे बातमीदार , संपादक, मालक स्वतःच्या चष्म्यातून पाहतात. आणि लोकशाहीने प्रत्येकाला स्वतःच्या नजरेतून पाहण्याचा अधिकार दिला आहे.

भारतात एकूण पाच विचारांचे राजकीय पक्ष आहेत आणि या पाचही विचारणा वाहिलेली माध्यम सुद्धा आहेत. अर्थात एखाद्या विचारचा पुरस्कार करणे हा माध्यमांचा अधिकार आहे. आणि वृत्तपत्र किंवा माध्यम हा व्यवसाय चालविण्यासाठी एखाद्या विचारांची तळी माध्यमांना कधी आपल्या वैचारिकतेला अनुसरून तर कधी मजबुरीने स्वीकारावी लागते.

१)हिंदुत्ववादी (भाजप), २)काँग्रेस3) समाजवादी ४) कम्युनिस्ट ५) प्रादेशिक अस्मिता जोपासणारे पक्ष.
जसे पाच विचारांचे राजकीय पक्ष तसेच पाच विचारांची माध्यम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या भोवती असलेल्या माध्यमांकडे आणि त्यांच्या वैचारिकतेकडे नजर टाकली तर हे माध्यम कोणत्या बाजूच आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल. झी (सुभाषचंद्र), इंडिया टीव्ही (रजत शर्मा) आजतक इंडिया टुडे ग्रुप (अरुण पुरी) आणि अर्थात सध्या आपल्या आक्रस्ताळी चर्चेने गाजणारा अर्णब गोस्वामी (रिपब्लिक) ही माध्यम भाजपला त्यातही मोदींना अनुकूल आहेत. सुभाषचंद्र सारख्यानी काही काळ नितीन गडकरींची तळी उचलण्याचा प्रयत्न केला पण नंतर गरजेनुसार तेही मोदीमय झाले. अर्थात भाजपला तरुण भारत, पांचजन्य , ऑर्गनायझर यासारखी हक्काची माध्यम आहेतच . तसच सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. आपल्या माध्यमातून आपले विचार (चुकीचे असले तरी) लोकांच्या माथी मारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.आणि त्याचमुळे की काय अनेक वेळा निरर्थक असलेल्या बातम्यांना सुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळते. एनडीटीव्ही, हिंदू या माध्यमांची डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीशी तर हिंदुस्थान टाईम्स या दिल्लीतील बड्या वृत्तपत्राची जवळीक काँग्रेसशी मानली जाते.तर टाइम्स हा वृत्तसमूह अगदी १८३६ पासून सत्तेवर असलेल्या सरकारच्या बाजूने राहण्याची पॉलीसी ठेऊन आहे.

जेव्हा एखादा बातमीदार बातमी देतो तेव्हा त्याचा संबंध त्या वृत्तपत्राच्या राजकीय वैचारिकते पासून सुरू होऊन सर्वात शेवटी बातमीदारपर्यंत येतो. हा बातमीदार नोकरी करत असतो. त्याच कुटुंब त्याच्या पगारावर अवलंबून असत. त्यामुळे अनेक वेळा वैचारिक मतभेद असूनही एखादा पत्रकार जेव्हा आपल्या वैचारीकतेशी न जुळणार्या वृत्तपत्रात नोकरी करतो ती केवळ आपलं पोट भरण्यासाठी आणि त्यात गैर काहीही नाही.पत्रकारांनी कोणत्या बातम्या द्याव्या कोणत्या देऊ नये याविषयी अनाहूत सल्ला देणाऱ्या सर्वाना मला इतकंच सांगायचं आहे की बातमीदारांनी जर त्यांना दिलेलं काम पूर्ण केलं नाही किंवा वैचारिक मतभेदांच्या बुरख्याखाली काम करणं नाकारलं तर त्यांची नोकरी जाऊ शकते. अशा वेळी नोकरी गमावलेल्या पत्रकारांचे कुटुंब कोण चालविणार? अनाहूत सल्ला देणारे?

आज हा लेख प्रपंच करण्याचे कारण म्हणजे पत्रकारितेवर सुरू असलेली चिखलफेक. सुशांतसिंग या अभिनेत्याची आत्महत्या आणि कंगना राणावत या अभिनेत्रीचे ट्विट्स आणि तिच्या घरावर केलेली कारवाई या घटना प्रत्येक पत्रकार हा स्वतःच्या चष्म्यातून पाहतो. कायदेतज्ञ प्रशांत भूषणनी मीडियाला गटर म्हटल पण याच मीडीयाच्या भरवशावर त्यांचा एके काळचा आम आदमी पक्ष दिल्लीत सत्तेवर आला आहे हे ते विसरतात.

सामनातील पत्रकारांना सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयला देणं चूक वाटेल तर ते कंगनाच्या घरावरील कारवाईच समर्थन करतील. आणि अगदी याच्या उलट भूमिका रिपब्लिक किंवा तत्सम माध्यम घेतील. कुठल्याही बातमीकडे पाहण्याचा आमचाच चष्मा तेवढा चांगला आणि आमच्या विरुद्ध बोलणारे चूक किंवा देशद्रोही हे म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण आपल्या विरोधी विचाराना सरळ देशद्रोही म्हणण्याची प्रवृत्ती गेल्या सहा वर्षात जास्त वाढत चालली आहे. त्यातच गेल्या दोन दशकांपासून फेसबुक आणि व्हाट्सअप्प या अघोषित विश्वविद्यालयांची भर पडल्याने आपल्या विरोधी विचाराना असांसदीय भाषेत ट्रोल करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे.

अनेक हुशार विद्यार्थ्यांच माहेरघर असलेल्या जेएनयुमध्ये विद्यार्थी किती कंडोम वापरतात याच्यावर चर्चा करणार्या भाजपच्या पुढाऱ्यांची जशी माध्यम बातमी देतात तशीच हीच राजकीय मंडळी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मात्र मूग गिळून गप्प बसतात हेही लिहितात.

पण अस जरी असल तरीही आपल्यावर एखादं संकट आले किंवा प्रश्न निर्माण झाला तर अगदी पत्रकारांशी सहा वर्षात न बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सगळे जण मीडियावर आगपाखड करण्यास तत्पर असतात. त्यावेळी ते हे विसरतात बातमीदार हे कुठेतरी नोकरी करत असतात तर प्रत्येक माध्यमाचा स्वतः च असा चष्मा असतो. माध्यमांना केवळ सुशांत आणि कंगना हे विषय दिसतात,अस आंबेडकर म्हणतात. पण त्याच माध्यमांनी प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केल्यास माध्यम काँग्रेसला विकल्या गेल्याच उत्तर मिळत.

 

या लेखाचा मतितार्थ इतकाच की कोणताही पत्रकार कुठल्याही घटनेचं वृत्तांकन त्यावरील भाष्य किंवा चर्चा आपल्या स्वतःच्या किंवा मालक-संपादकाने घालून दिलेल्या चष्म्यातून करतो. तो त्याचा पोट भरण्याचा व्यवसाय असतो. कुठल्याही घटनेवर जसे पाच प्रकारचे राजकीय विचार असतात तसेच या पाच राजकीय विचारांनी प्रभावित असलेली पाच प्रकारची माध्यम असणं हे साहजिकच आहे.जोडीला फेसबुक, व्हाट्सअप्प आहेतच. त्यामुळे कुठल्याही वृत्तांकनाबद्दल मीडियाला दोष न देता मायबाप वाचकांनी सर्व प्रकारचे विचार वाचून, ऐकून आणि पाहून स्वतः ला योग्य वाटेल अस सर्वसमावेशक मत बनवावं, अस एक बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला पत्रकार म्हणून माझं मत! पटल्यास मान्य करा नाहीतर विसरून जा! तूर्तास इतकेच!

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here