काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा कायम, बहुमत मविआकडेच! : नाना पटोले

0
381

काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा कायम, बहुमत मविआकडेच! : नाना पटोले

महाराष्ट्रातील राजकीय महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई, दि. २३ जून: राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. ईडीची भिती दाखवून सरकार पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे मात्र बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला असलेला काँग्रेसचा पाठिंबा कायम आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

 

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार उपस्थित होते.

 

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कसलाही धोका नसून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. बहुमताचे संख्याबळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही. शिवसेनेत जे काही चालले आहे ते लवकरच थांबेल. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र विकास आघाडीबरोबरच आहे. परंतु ईडीची भिती दाखवून सरकार पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यातील राजकीय महाभारतामागे भाजपाचाच हात आहे. आताही भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नाही. हे सर्व भाजपाकडूनच घडवले जात आहे पण ते समोर येत नाहीत. भाजपाने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही यात ते यशस्वी होणार नाहीत.

 

भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी २०१९ साली काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी मान्यता दिली होती. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे आणि हा पाठिंबा कायम राहील असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here