सैतानाच्या पापाचे भागीदार बनू नका ! – ज्ञानेश वाकुडकर

0
541

सैतानाच्या पापाचे भागीदार बनू नका ! – ज्ञानेश वाकुडकर

 

एक पंतप्रधान आणि बारा मंत्र्यांची घरं संतापलेल्या जनतेने एका पाठोपाठ जाळून टाकली. एका माजी मंत्र्याला त्याच्या गाडीसह जलाशयात फेकून दिले. अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पक्षाच्या पंतप्रधानाला घरासह जिवंत जाळण्याचा लोकांचा हेतू होता, असं तेथील मिलिटरीने जाहीर केलं आहे. सैन्याच्या मदतीने कसा बसा स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवत हा पंतप्रधान एका सैनिकी तळावर लपून बसला आहे. गेल्या आठवड्यातील ह्या ताज्या घडामोडी आहेत. सारेच धक्कादायक, सारेच अकल्पित !

श्रीलंका एक छोटा देश आहे. भारताच्या सीमेपासून अवघ्या ३१ किलोमीटर अंतरावर. सुमारे २.२० कोटी लोकसंख्या. महाराष्ट्राची लोकसंख्या श्रीलंकेपेक्षा सहापट मोठी आहे. विदर्भाची लोकसंख्या देखील श्रीलंकेच्या दीडपट आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याएवढा हा चिमुकला देश.

सत्तेचा हव्यास माणसाला जनावराच्याही खालच्या पातळीवर नेवून ठेवतो. देश कोणताही असो, धर्म कोणताही असो माणूस एकदा द्वेषाने पछाडला की त्याचा थेट भस्मासुर होतो..आणि शेवटी स्वतःच स्वतःचा विनाश ओढवून घेतो.

पण ह्या पंतप्रधानाचं घर, डझनभर मंत्र्यांची घरं लोकांनी का जाळली? कोण होते हे लोक ? त्यावेळी पोलीस काय करत होते ? मिलिटरी काय करत होती ? जनतेला त्यांनी का अडवले नाही ?

मुळात हे कुणी विरोधक नव्हते. याच लोकांनी भरभरून मते देऊन त्यांना सत्तेत बसविले होते. विरोधी पक्षाचा पार सफाया केला होता, त्याच लोकांनी आपणच निवडून दिलेल्या नेत्यांची घरं का जाळावित हा खरा प्रश्न आहे.

दोन भाऊ – महिंदा राजपक्षे, गोताबाया राजपक्षे, एक पंतप्रधान, दुसरा राष्ट्रपती. सारी सत्ता एकाच घरात. दोघांचाही धर्म बौद्ध. पण बुद्धाचे तत्वज्ञान मातीत घालणारी, त्याला काळीमा फासणारी मनोवृत्ती. तमिळ, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक समाजाचा द्वेष हा यांच्या राजकारणाचा आधार. त्यासाठी समाजात विषपेरणी करण्यात आली. ’हे खाऊ नका, त्यावर बहिष्कार टाका’ असले मूर्खपणाचे चाळे बहुसंख्य सिंहली लोकांना आवडायला लागले. अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करण्यात आले. उन्माद वाढला. कत्तली झाल्या. नरसंहार झाला. नावं वेगळी असली तरी थेट आपल्या अलीकडच्या भारतीय राजकारणाची अस्सल झेरॉक्स कॉपी! आपल्यासारखाच उन्माद, आपल्या सारखेच बिनडोक युक्तिवाद, आपल्यासारखाच राजरोस भ्रष्टाचार, आपल्यासारखाच दलाल मीडिया, आपल्यासारखेच बेवकुफ अंधभक्त आणि आपल्या सारखेच रातोरात घेतले गेलेले शेखचिल्ली निर्णय ! तरीही जनतेचे डोळे उघडत नव्हते. अंधभक्त आपल्यासारखेच चेकाळत होते.

पण जेव्हा महागाई आवाक्याबाहेर गेली, गॅस मिळेनासा झाला, पेट्रोल मिळेनासे झाले, ब्रेडसाठी मोठमोठ्या रांगा लागल्या, लोक अन्नासाठी तडतडू लागले, तेव्हा नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. लोक रस्त्यावर आले. खोटा राष्ट्रवाद भुकेपुढे तग धरू शकला नाही. शांततापूर्ण आंदोलन, निदर्शने सुरू झाली. सत्ताधाऱ्यांनी उपाय योजना करण्याऐवजी भाड्याचे कार्यकर्ते, पक्षाचे गुंड गाड्यांमध्ये भरून आणले आणि आंदोलकांवर सोडले. अगदी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा जसा अघोरी प्रकार आपल्या सत्ताधाऱ्यांनी केला होता, तस्साच प्रकार तिथेही सुरू झाला. जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि सरकार अत्यंत खालच्या पातळीवर गेले. ’जो कुणी आंदोलकांवर हमले करेल, त्यालाच फक्त सरकारी योजनांचा लाभ घेता येईल’, अशा प्रकारची हलकट भूमिका सरकारने घेतली. आपल्याकडे बाजारबसव्या प्रवृत्तीच्या लोकांना झेड सिक्युरिटी देवून गौरविण्यात येते, अगदी तसेच!

पण शेवटी जनतेच्या असंतोषाचा भडका उडाला. संयमाचा बांध फुटला. पोलीस, मिलिटरी सारे हतबल झाले. मंत्री, राजकीय नेते यांच्यानंतर संतापलेली जनता आता गोदी मीडियाला शोधून शोधून आपला राग व्यक्त करत आहे. कोणताही देश असो, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. त्यात सर्वांचाच बळी जाईल. काही पागल माकडांच्या नादी लागून अख्खा गाव उध्वस्त होता कामा नये. आपण सर्वांनी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्या देशातही भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. राफेल पासून नोटबंदी, कोरोणा पॅकेज यांच्या नावावर उघड उघड भ्रष्टाचार झालेला आहे. नफ्यात सुरू असलेल्या सरकारी कंपन्या, उद्योग कवडी मोलाने विकले जात आहेत. न्यायालये बोलायला तयार नाहीत. विरोधकांना धमकावणे, खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकणे, ब्लॅकमेल करणे, पक्ष बदलून तीच व्यक्ती सत्ताधारी पक्षात गेली, की तिचा उदोउदो करणे, टपोरी लोकांना हाताशी धरून विरोधकांची निंदानालस्ती करणे, धमक्या देणे, धडधडीत खोटे बोलणे असल्या असंख्य विकृतींनी सध्याचे सत्ताधारी राजकारण बरबटले आहे. एक प्रकारचा माज सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसतो. खोटा इतिहास, खोटे पुरावे, देव – धर्म, असल्या भाकड गोष्टीत देशाला गुंतून ठेवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी आखलेले आहे.

पण पोटाची भूक जास्त काळ शांत राहू देत नाही. एकदा जनता खवळली की मग तुमचे पोलीस, मिलिटरी काहीही करू शकत नाही. शेवटी तेही ह्याच समाजाचा घटक आहेत. तीही माणसंच आहेत ! त्यांच्याही सहनशीलतेला मर्यादा असतेच.

आपल्याला भारताची श्रीलंका होऊ द्यायची नसेल, तर वेळीच सावध झाले पाहिजे. जर हे आपल्याकडे सुरू झाले, तर त्यातून प्रचंड मोठा अनर्थ ओढवणार आहे. कारण भारत हा श्रीलंकेसारखा पाच सहा जिल्ह्यांचा देश नव्हे. श्रीलंकेएवढे सत्तर देश पोटात सामावतील एवढा प्रचंड आपला विस्तार आहे. असंख्य जाती आहेत, असंख्य धर्म आहेत, असंख्य भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत. अशा खंडप्राय देशात असे अराजक माजणे कुणालाही परवडणारे नाही. कुणालाही झेपणारे नाही. अनेकांच्या बलिदानातून, समर्पणातून हा देश आकारास आला आहे. एका माळरानाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. अनेक पिढ्या खर्च झालेल्या आहेत. अनेकांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले आहे. अजून बराच पल्ला गाठायचा बाकी होता. त्यात मध्येच ही टोळधाड घुसली. सारं उध्वस्त करून टाकलं.

धर्म, जात, भाषा, प्रांतवाद, नकली राष्ट्रवाद या दुष्टचक्रात आपण कळत नकळत फसलो आहोत. फसवले गेलो आहोत. माकडांच्या आरत्या गायला लागलो आहोत. त्यांनाच आपले भाग्यविधाते समजायला लागलो आहोत. म्हणूनच आपणही आज अराजकाच्या दारात उभे आहोत. आपण कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा किंवा कोणत्याही पक्षाचे असा, जर तुम्हाला खरंच माणूस म्हणून जगायचं असेल, द्वेष हा तुमच्या जगण्याचा आधार असता कामा नये. आज आपण विनाशाच्या दाराशी येऊन पोहचलो आहोत. जवळ आली असली, तरी वेळ अजून गेलेली नाही. कृपया स्वतःला सावरा. स्वच्छ मनाने विचार करा. एकमेकांशी संवाद साधा. सत्य समजून घ्या. झालेल्या चुका मान्य करा. त्यात कमीपणा वाटून घेऊ नका.

माणूस जगला तरच देश जगेल, धर्म जगेल आणि तुम्हीही जगाल, याचं भान ठेवा. तुमच्या पुढच्या पिढ्यांची राख रांगोळी करायची दुर्बुद्धी ज्या नेत्यांच्या हलकटपणामुळे तुम्हाला झाली, त्यांची ताबडतोब साथ सोडा. यापुढे कोणत्याही सैतानाला साथ देऊ नका. त्याची भक्ती करू नका. अन्यथा तुमच्याच पुढच्या पिढ्या तुमच्या तोंडात शेण घालतील यात संशय नाही. तेव्हा विचार करा. सैतानाच्या भक्तीतून बाहेर पडा.

सत्ताधाऱ्याकडे प्रचंड पैसा आहे, पोलीस आहेत, गुंडांच्या टोळ्या आहेत, त्यांच्याच बाजूने न्यायालये, त्यांच्याच बाजूने मीडिया आहे, सेना देखील त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ’आम्ही कुणालाही चिरडून टाकू शकतो,’ अशा भ्रमात ते आहेत. पण वेळ फिरली म्हणजे ह्यातले कुणीही त्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत. जे लोक कालपर्यंत जयजयकार करत होते, तेच लोक यांना कुत्र्यासारखे हाल करून मारतील. ह्याला इतिहास साक्षी आहे.

श्रीलंकेत मागील निवडणुकी मध्ये विरोधी पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती, पण आता त्याच पक्षाच्या नेत्याला नवा पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं लागलं, एवढी एकच गोष्ट लक्षात घेतली तरी आपल्या सत्ताधाऱ्यांना शहाणपणा यायला मदत होईल !

तुम्ही मात्र सैतानाचे साथीदार बनू नका, सैतानाच्या पापाचे भागीदार बनू नका..!

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर
9822278988

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here