संसाराचा गाडा हाकलत ललिता टाकभौर (करमनकर) झाली न्यायाधीश

0
683

संसाराचा गाडा हाकलत ललिता टाकभौर (करमनकर) झाली न्यायाधीश

सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार; जिद्दीच्या जोरावर मिळविले यश

 

राजुरा : लग्नानंतर संसारात गुरफटून राहणाऱ्या बहुतांश मुली पाहायला मिळतात, परंतु संसाराचा गाडा हाकलत मनात जिद्द, चिकाटी व ध्येयप्राप्तीसाठी इच्छाशक्तीच्या जोरावर संकटावर मात करून यश संपादित करणारी ललिता सारखी एखादीच मुलगी दिसेल. बामनवाडा येथील ललिता ताराचंद्र टाकभौरे (करमनकर) या सामान्य कुटुंबातील मुलीने संसाराचा गाडा हाकलत अभ्यास-जिद्द व चिकाटीच्या जोरावर न्यायाधीशची परीक्षा उतीर्ण केली आहे. लग्नानंतर न्यायाधीश परिक्षा उत्तीर्ण होऊन तालुक्यात मानाचा तुरा रोवणाऱ्या ललिताचा नुकताच माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्यांच्या सत्कार केला आहे.

 

ललिता टाकभौरे (करमनकर) ही सामान्य कुटुंबातील आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान व्हावे, असे तिच्या आईवडिलांचे सुरुवातीपासून स्वप्न होते. आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ललिताने मनाशी निश्चय केला. विधी शाखेत शिक्षण घ्यावे याकरिता वडिलांनी प्रोत्साहन दिले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातून तिने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात एलएलएम मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. तिची ही गगनभरारी होतकरू मुलींसाठी प्रेरणादायी ठरू पहात आहे.

 

आता तिने न्यायाधीश पदाच्या परीक्षेत राज्यातून १३ वी रँक मिळवित परीक्षा उतीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतर मुली संसारात रमून जात असतात. पण ललिता अपवाद ठरली आहे. तिने संसाराचा गाडा पुढे नेत असतानाही शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. पती सूरज करमनकर यांनीसुध्दा तिला मदत केली. सामान्य कुटुंबातील तिची ही यशप्राप्ती अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. शिक्षणाची आवड, जिद्द, निरंतर अभ्यास व ध्येयप्राप्तीची इच्छाशक्ती असेल तर संकटावर मात करून उंच शिखर गाठता येते, हेच ललिताने दाखवून दिले आहे.

 

यावेळी आपल्या तालुक्यातील संसारीत मुलीने यश संपादित केल्याचा सार्थ अभिमान बाळगत ललिताच्या घरी जाऊन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सत्कार केला यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अविनाश जाधव, प्रियदर्शनी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज पावडे, शेणगावचे प्राचार्य नितीन कडवे साखरीचे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, शिक्षक बजरंग जेणेकर, डोमेश बोन्डे, चूनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, बामनवाड्याचे माजी सरपंच सदानंद वाघमारे, उषा करमनकर, ललिता अंड्रस्कर, राकेश कार्लेकर, सुकन्या मार्कंडी, तानेबाई भगत, प्रकाश आस्वले, गुलाब लिंगे, मंदा धुर्वे, गणपत निवलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here