महिलादिनी लाजाळू बायका बोलत्या झाल्या !

0
388

महिलादिनी लाजाळू बायका बोलत्या झाल्या !

गोंडपिपरी : गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील महिलांचा समूह एकत्र आला. आपल्या अधिकार व कर्तव्याची ओळख समाजवर्गाला व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून बदल घडविण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रमोद निमगडे यांच्या आवारात प्रथमच आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला.

यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान व्यासपीठावर पूर्वी कधीच न बोलणाऱ्या बायका प्रथमच स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्याबाबत भरभरून बोलल्या.

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता थेरकर उपस्थित होत्या. उद्घाटन स्वाती गर्कल यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रमोद निमगडे, युवराज सोयाम यांनी हजेरी लावली. दरम्यान पुरुष प्रधान संस्कृतीतही शहरात प्रथमच महिलांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुरुषांनी मोठा वाटा उचलला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होणाऱ्या महिलांचा सन्मान चक्क पुरुषांनी केला. उपस्थित सर्वच महिलांनी महिला दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या बोलत्या झाल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या सुप्तगुणांना देखील या माध्यमातून उजाळा मिळाला.

अत्यंत उत्साही व आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. महिलांची प्रगती व त्यांच्या उन्नतीसाठी ज्या ज्या महापुरुषांचे योगदान लाभले त्यांच्या जीवन चरित्रावर महिला भरभरून बोलल्या. त्यांचा इतिहास समाजापुढे मांडण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न त्यांच्याकडून झाला.

विशेष अतिथी स्थानावरून मार्गदर्शन करताना प्रमोद निमगडे यांनी महिलांचा उत्साह वाढविला. ते म्हणाले, भारतीय संविधानात महिलांना व्यापक अधिकार प्राप्त झाले असून महिलांनी आपले संविधानिक अधिकार जाणून आपल्या आणि समाजाच्या हितासाठी सातत्याने यशसंपादन करावे, प्रगती साधण्याचे आवाहन केले. दरम्यान अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना लता थेरकर यांनी सांगितले की, महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून त्या देखील उत्तम कामगिरी करीत सर्वच क्षेत्रात प्रगती साधत आहेत. याहीपुढे जात महिलांनी आपला आत्मसन्मान कायम ठेऊन जग जिंकण्यासाठी प्रयत्न करावा, असे विचार मांडले.

कार्यक्रमाला चारुशिला निमगडे, पुजा मुंडे, निशा भिले, अनिता सोयाम, ममता निमगडे, संगीता आत्राम, कल्याणी, पल्लवी, शुभांगी, दीपक्षिका, माही, रिया, भुवनेश्र्वरी यासह वार्डातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here