शोषखड्डे निर्मितीतून गाव टंचाईमुक्त करा – दिलीप बैलनवार

0
440

शोषखड्डे निर्मितीतून गाव टंचाईमुक्त करा – दिलीप बैलनवार

तालुक्यातील नांदगाव येथून घर तिथे शोषखड्डा उपक्रमाचा प्रारंभ

 

चंद्रपूर : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम उन्हाळ्याच्या दिवसांत बघायला मिळतात. विहिरी, हातपंप कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही समस्या अनेक गावांत उद्भवत असते. या समस्येवर मात करण्यासाठी जमिनीत पाणी मुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने गावातील पाणी गावातच मुरविण्याच्या उद्देशातून घर तिथे शोषखड्डा हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक कुटुंबीयांनी या उपक्रमात सहभागी होत शोषखड्डे निर्मिती करून गाव टंचाईमुक्त करावे, असे आवाहन कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार यांनी केले आहे.

कोरपना पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नांदगाव या गावातून शोषखड्डा उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलीप बैलनवार बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच विजय निखाडे, सचिव रामदास राठोड, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक सुनिल नुत्तलवार, लॉरेन्स खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार पुढे म्हणाले, राज्य शासनाचा घर तिथे शोषखड्डा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील पाणी गावात मुरविले जाणार आहे. यातून जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होवून गावे पाणीटंचाईमुक्त होतील. सोबतच गावही सुजल व स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १०० दिवसांच्या कालावधीत गावातील प्रत्येक घरी शोषखड्डा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबीयांनी या उपक्रमात सहभागी होवून घरी शोषखड्डा बांधून घेत स्वत:चे गाव सुजल करण्यास हातभार लावावा.

गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी घर तिथे शोषखड्डा बांधून उपक्रमात सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

“उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गावातील पाणी गावातच मुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी घर तिथे शोषखड्डा हा उपक्रम राबविला जात आहे. गाव टंचाईमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.”
दिलीप बैलनवार
गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here