कटाक्ष: प्रकाशराव सनातन हिंदुत्वाच्या बेड्यात पुन्हा अडकायचे का?जयंत माईणकर

0
289

कटाक्ष: प्रकाशराव सनातन हिंदुत्वाच्या बेड्यात पुन्हा अडकायचे का?जयंत माईणकर

प्रति आदरणीय,
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर
खर तर हे पत्र लिहिताना मला अतिशय यातना होत आहेत. कारण आपण आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आम्हाला सुद्धा आदरणीय.
काळा राम मंदिर प्रवेशासाठीचा डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षात त्यांनी दगडांचा माराही सहन केला. मात्र, मंदिर प्रवेश न मिळाल्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली. बौद्ध धर्माचा स्वीकार करून समाजाला नवी दिशा दिली. बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी जातीयतेतून आणि अस्पृश्यतेतुन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून घेतली. मनुवादी हिंदू धर्मात कधीच स्थान मिळणार नाही. माणूस म्हणून इतर समूहांच्या बरोबरीने उभे राहायचे असेल तर जातीयता जोपासणारा धर्म सोडावा,त्यातून बाहेर पडा ही भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती.
बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे हिंदू धर्माच्या त्यागाची आणि बौद्ध धम्माच्या स्वीकाराची समांतर प्रक्रिया होती. एका बाजूला जुन्या रूढी परंपरा त्यागत जायच्या आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने जगण्याच्या नवा मार्ग स्वीकारत जायचा. पण या २२ प्रतिज्ञाची सुरुवातीच्या तीन प्रतिज्ञामध्ये मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही या आहेत. पण आज आपण पंढरपुरात मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केलं.
समानतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा त्याग केला होता पण आज प्रकाश आंबेडकर आपण हिंदुत्ववाची शाल पांघरली आहे. आता तुमचे समर्थक त्याला सर्वव्यापी राजकारण आहे असा दावा करत आहेत.
ओबीसी समाज,गोरगरीब, शेतकरी ,कष्टकरी वर्ग हा विठ्ठल भक्त आहे. त्या समाजाने तुम्हाला मते द्यावे अशी तुमची इच्छा असेल पण किती ओबीसी समाजाने यापूर्वी तुम्हाला मते दिली आहेत याचा विचार करायला हवा.
आज समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यापासून समाजात मोठे परिवर्तन झाले आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या मार्गावर जाऊन अनेक जणांनी मोठे पद प्रतिष्ठा मिळवले आहे. तुम्ही बाबासाहेबांचे नातू आहात तर तुम्ही समाजाला पुढेच घेऊन जाल अशी अपेक्षा होती मात्र तुम्ही तर पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आणू पाहत आहात. ही एक प्रकारची बाबासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणच आहे.
लोकशाहीत जनहीताला प्राधान्य दिले जाते, आपणही लोकशाहीला मानता. आज संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. लाखो लोकांचे बळी त्यामधे गेले आहेत. महाराष्ट्रातही भयंकर स्थिती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊन त्याच्या प्रसार होऊ नये यासाठी मंदिर बंद होते. पण आपण तेच मंदिर उघडण्यास सांगत त्यातून कोरोना संसर्ग झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न आहे.
तसेच तुम्ही बौद्ध धर्माचे उपासक आहात, देशातील अनेक बुद्धीविहारेही बंद आहेत मात्र त्याविषयीही आपण आवाज उठवला नाही याची खंत वाटते.

वास्तविक पाहता आपल्या या गुप्तपणे भाजपला मदत करण्याचा राजकारणाची चुणूक१९८४च्या लोकसभा निवडणुकीतच दिसली. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत अकोल्याहुन काँग्रेसचे स्व मधुसूदन वैराळे निसटत्या बहुमताने का होईना निवडून आले होते. स्व. वैराळे, स्व. पांडुरंग फुंडकर आणि आपण स्वतःअशी ती तिरंगी लढत होती.पण १९८९ पासून पुरोगामी आणि काँग्रेस विचारसरणीला अनुकूल असलेला हा मतदारसंघ केवळ आपल्या उमेदवारीमूळे भाजपच्या झोळीत आंदण दिला जातो तो केवळ आपल्या उमेदवारीमुळे. तिरंगी लढतीत मतविभाजनाचा
फायदा हा उत्तर प्रदेश पासून सगळीकडे केवळ भाजपला होतो ही वस्तुस्थिती आम आदमी पक्ष, विखुुुरलेल्य जनता परिवारातील समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, रिपब्लिकन सारखे स्वतःचा मतदारसंघ असलेले पक्ष केव्हा समजतील कोण जाणे! अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा ‘बाळराजे’ हट्ट भाजपने न मानल्यामुळे का होईना शिवसेनेला ही गोष्ट उमजली.

खर तर ही गोष्ट चार दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या आणि १२ वर्षे खासदार राहिलेल्या आपल्या सारख्या राजकारण्याला समजली नसेल अस शक्यच नाही. आणि म्हणूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर युती करावी अशी इच्छा राजकीय चर्चात व्यक्त होत होती. पण आपण गोपीनाथ पडळकर नावाच्या त्यावेळी आपल्या पक्षाचे प्रवक्ते असलेल्या संघ परिवाराच्या हस्तकाकरवी स्वतःच्या पक्षाला २४० जागा घेऊन काँग्रेसला उर्वरित जागा देऊन राष्ट्रीय पक्षाचा घोर अपमान करणारी घोषणा केली. त्यावेळी आपण जर काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली असती तर आजआपण सरकारमध्ये असता आणि शिवसेना भाजपबरोबरच राहिली असती. संघ परिवाराच्या विरुद्ध कायदा करावा, बंदी आणावी हा आपला आग्रह. पण आपल्या पंढरपूरच्या आंदोलनामुळे संघाच्या राम मंदिरा सारख्या सर्व आंदोलनांना बळकटी मिळते ही वस्तुस्थिती आपण का लक्षात घेत नाही. की जाणीवपूर्वक त्याच्याकडे कानाडोळा करता. आणि मग प्रश्न उभा राहतो की आपल्याला
खरच संघ परिवाराला नेस्तनाबूत करायचं आहे की छुपी मदत करत त्यांना मोठं करायचं आहे. आणि वस्तुस्थिती अशी दिसते की आपली १९८४ पासूनची प्रत्येक कृती केवळ भाजपलाच मदत करणारी ठरलेली आहे. आणि मंदिर प्रवेशाच्या आपल्या आंदोलनामुळे आपल्यावरील या आरोपाला बळकटी मिळाली आहे.

एकूण आपलं चार दशकांच राजकारण हे केवळ भाजपला छुपी मदत करण्यात गेलं आहे. रामदास आठवले तर भाजपच्या कळपात केव्हाच सामील झालेत. बाबासाहेबांना मानणाऱ्या समर्थकांना आता कोणत्या नेतृत्वाखाली काम करावे कोणाला मानावे हा प्रश्न पडला आहे.
प्रकाशराव, उत्तर मिळेल?
कळावे

आपला

जयंत माईणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here