जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती

0
414

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती

शेतकऱ्यांसाठी होणार संरक्षित सिंचनाची सोय

लोकसहभागातून जिल्ह्यात पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर त्यांचे उत्पन्न वाढेल. दोन पैसे हाती येईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात ” वनराई बंधारा” ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत केवळ 10 दिवसात जिल्ह्यात लोक सहभागातून 2604 वनराई बंधारे बांधण्यात आले आहे.

जिल्ह्यात 5 हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून आतापर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी 260 याप्रमाणे दहा दिवसांत 2604 बंधारे बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधि, नागरिक, विद्यार्थी आदिंचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 25 एकरापर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात वनराई बंधा-याच्या माध्यमातून 40 ते 45 हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी आहे आणि बोरवेलसाठी सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे ठिबक सिंचनाचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चंद्रपूर तालुक्यात 210 बंधारे, बल्लारपूर 240, मुल 270, सावली 130, वरोरा 152, चिमूर 120, भद्रावती 145, नागभीड 180, ब्रह्मपुरी 215, सिंदेवाही 157, राजुरा 245, गोंडपिपरी 210, पोंभुर्णा 120, कोरपना 140 तर जिवती 70 असे एकूण 2604 बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.

सहज बांधता येईल असा वनराई बंधारा :

12 मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी 700 ते 800 रिकामी पोती, घमेली, फावडा व प्रवाहाच्या आजूबाजूला असलेली माती एवढ्या गोष्टीची आवश्यकता असते. बांधकाम करताना भरलेल्या मातेच्या पिशव्या दोरीने शिवुन तयार कराव्यात. वनराई बंधारा बांधत असतांना, जागेची निवड करतांना ओढ्याची रुंदी कमी असावी. पाणी साठा भरपूर प्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी. बंधाऱ्याचे दोन्ही काठ हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे.

बंधारा बांधायला सुरूवात करण्यापूर्वी प्रवाहवरील दगड व गाळ काढून साफ करून घ्यावा. जेणेकरून बंधाऱ्याच्या खाली राहणाऱ्या मोकळ्या जागेतून पाणी वाहून जाणार नाही. 0.60 मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यांच्यामध्ये 0.30 मीटरचा गॅप ठेवावा. काही ऊंचीपर्यंत पोत्याचे 3 थर तयार करावेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here