आपली संस्कृती आयुर्वेदानुकुल – प्रणीता भाकरे

0
367

आपली संस्कृती आयुर्वेदानुकुल – प्रणीता भाकरे

 

 

यवतमाळ, मनोज नवले 

“भारतीय संस्कृती ही भारतीय पर्यावरणाचा विचार करीत जीवन जगण्याचा मार्ग असून दिनचर्या, रात्रिचर्या, ऋतुचर्या इ. विविध पद्धतीने आहार आणि विहाराच्या द्वारे रोग झाल्यावर उपाय नाही तर होऊ नये यासाठी मार्ग सांगणे, केवळ याच जीवनाचा नाही परलोकाचे देखील हित साधण्याची क्षमता आयुर्वेदाने आपल्याला प्रदान केली आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणात आपण आपल्या या दिव्य ठेव्याला नावे ठेवत आहोत, त्याच्या अद्वितीय लाभापासून स्वतःला वंचित करीत आहोत. हे खरे दुर्दैव आहे. आयुर्वेदाने मांडलेल्या सिद्धांताचा उपयोग करीत स्वतःच्या जीवनाला सुंदर समृद्ध आणि आनंददायी करायला हवे.” असे विचार संस्कृत भारतीच्या विदर्भ प्रांत शिक्षण प्रमुख तथा विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख प्रा. प्रणीता प्रशांत भाकरे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझं गाव माझा वक्ता या अभिनव व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना आयुर्वेदोक्त दिनचर्या या विषयावर त्या व्यक्त होत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप अलोणे विराजमान होते.
आपल्या गावातील आपल्या वक्त्यांना आपल्या गावातच हक्काचे व्यासपीठ असावे या भूमिकेतून सुरू झालेल्या या व्याख्यान मालिकेचे प्रास्ताविक करताना विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी वणी नगरात आजवर संपन्न झालेल्या विविध व्याख्यानमालांच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
राजेश महाकुलकार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिल्यानंतर, प्रणीता भाकरे आणि प्रशांत भाकरे या दाम्पत्याच्या मेघा अलोणे आणि डॉ.दिलीप अलोणे या उभयतांनी सत्कार केला.
आपल्या अत्यंत अभ्यास पूर्ण आणि ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये प्रणीता भाकरे यांनी आयुर्वेदातील नस्य, गंडूश, दंतधावन, कवल, अंजन, धूम्रपान, उद्वर्तन,अभ्यंग, स्नान, भोजन अशा विविध क्रियांच्या माध्यमातून आयुर्वेदोक्त दिनचर्या कशी असावी? याविषयी सविस्तर विवेचन केले.
या प्रत्येक कृतीचे महत्व, त्यावेळी घेण्याची काळजी यांचे विवेचन करताना विविध आवेग, विरुद्ध अन्न, कोणत्या ऋतूत कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत इत्यादी आणि विषय सुद्धा अनुषंगिक रीत्या स्पष्ट केले.
विविध सुभाषितांचा मुक्त वापर तथा स्नानाचा विषय निघाल्यावर आठ प्रकार के स्नान इ. विषयातील विविध उपप्रकारांचे वर्णन यामुळे हे व्याख्यान श्रोत्यांच्या पसंतीचा आणि उपयोगाचा विषय ठरले.
अध्यक्षीय मनोगतात कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राचे आणि आयुर्वेदाचे महत्त्व जनतेला कसे जावे यावर डॉक्टर दिलीप अलोणी यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी नागपूर येथील हिंगणा येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात वणीचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांचा सुभाषजी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांचे विशेष साहाय्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here