कटाक्ष:सुशांतसिंग राजपूत! एक दास्तान! जयंत माईणकर

0
353

कटाक्ष:सुशांतसिंग राजपूत! एक दास्तान! जयंत माईणकर

सुशांत सिंग राजपूत! एक बिहारी कलाकार दहा वर्षांपूर्वी मुंबईच्या मायनगरीत करिअर सुरू करतो. ज्युनिअर आर्टिस्ट पासून हिंदी चित्रपटात मोठ्या बॅनरखाली नायक
असा मोठा पल्ला गाठतो. एक दिवस अचानक हा अभिनेता गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवतो. त्याची आत्महत्या राजकारणी, मीडिया सर्वांच्या साठी एक मोठा विषय बनून बसला आहे.

एखादा विषय केवळ मीडियाने लावून धरला तर मीडियाने तो विषय मोठा केला असा आरोप होतो. पण मीडिया हा एक व्यवसाय आहे, ज्या गोष्टींमध्ये लोकांना रस असतो त्याच गोष्टी दाखवल्या किंवा लिहिल्या जातात. एका सर्व्हेनुसार सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ६६३३२ बातम्या स्थलांतरित कामगारांवर १०७४० बातम्या तर शेतकऱ्यांवर ३३७१ बातम्या केल्या गेल्या आहेत. तसेच मीडियाला स्वातंत्र्य आहे पण काही गोष्टींची नैतिकता देखील पाळायला हवी सुशांत आईच्या मृत्यूनंतर तणावात होता किंवा त्याच्या वडिलांचे दुसरे लग्न झाले त्यामुळे तो नाराज होता त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असेल असा दावा करणेही अर्थहीन आहे.

दोन मैत्रिणी असलेला, दारुबरोबरच तथाकथित रित्या गांजाचंही सेवन करणाऱ्या आणि मुंबईत येऊन करोडपती झालेल्या सुशांतचा तसा राजकारणाशी किंवा राजकारण्यांशी कसलाही संबंध जिवंत असेपर्यंत नसावा किंवा नव्हताच. पण त्याच्या आत्महत्येनंतर हिंदुत्ववादी भाजप नेत्यांच्या जिभेवरच त्याच नाव थांबत नाही. आणि याला कारण आहेत येऊ घातलेल्या बिहार निवडणुका. लोकांच्या धार्मिक भावनांना अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने हात घालून दहा हजार लोकांच्या रक्ताचे पाट वाहिल्यानंतर दोन पंतप्रधान बनवू शकलेल्या भाजपने बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या नावांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सुशांत या विचारसरणीचा होता का तर नाही. २०१७ साली पद्मावत हा चित्रपट आला होता तेव्हा त्याला करणीसेना आणि राजपूत संघटनानी तीव्र विरोध केला होता. या कट्टरवादी संघटनांचे हिंदुत्ववादी संघटनाशी संबंध आहेत.
सुशांतने कट्टरवादी भूमिका न घेता पुरोगामी भूमिका घेत करणीसेना आणि राजपूत संघटनांचा तीव्र निषेध केला इतकेच नव्हे तर आपल्या नावापासून राजपूत हा शब्दही काढला होता.
एकदा पक्ष विरोधात असेल तर विकासाचे स्वप्न दाखवतो. पण जर पक्षच आधीच सत्तेत असेल तेही १५ वर्षांपासून. तर विकासाऐवजी निवडणूक भावनिक किंवा अस्मितेच्या मुद्द्यांवर फिरवले जाते. आज बिहारमध्ये पूर आणि कोरोनाचे प्रश्न असताना अभिनेता सुशांतसिंग राजपूत हा महत्वाचा केला आहे. सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी व्हावी याबाबत दुमत नाही, पण जनतेच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष होऊ नये ही अपेक्षा आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होती. पण राजकारण्यांनी असे वातावरण केले की, सुशांतचे
रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे. सीबीआयने राज्यातील एखाद्या प्रकरणाचा तपास करायला हरकत नाही, पण राज्यांच्या अधिकारांवर हे आक्रमण आहे. त्यात मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डसोबत केली जाते. अनेक कुख्यात गुन्हेगारांचा छडा मुंबई पोलिसांनी लावला आहे. तर बिहारमधील अनेक खून, हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, पण त्यापैकी किती खरे आरोपी आतापर्यंत सीबीआय पकडू शकली हा प्रश्न आहे.
बिहारमध्ये ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी ‘फौज’ बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मुखियाचे खरे आरोपी कोणी पकडले आहेत का, इतकेच नव्हे तर मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल , सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही.

सुशांत प्रकरणात आरोप प्रत्यारोपात सर्वात आघाडीवर होते बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वेर पांडे. एक म्हण आहे की कचरा साफ करायचा असेल तर तुमचा झाडूही साफ असायला हवा. तसेच जर तपासाचे अधिकारीही निःपक्षपाती असावेत. पण पांडे यांनी २००९ साली लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्ती घेतली होती. बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या पांडे यांना बक्सर मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळेल असं पांडे यांना वाटलं होतं. यामुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण स्थानिक भाजपनेत्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. पाच वर्षांपूर्वी पांडे यांची सीबीआयकडून चौकशी झाली होती. मुज्जफरापूरमध्ये गाजलेल्या १२ वर्षीय मुलीच्या अपहरणच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीसंदर्भात सीबीआयकडून पांडे यांची चौकशी झाली होती.
तर सुशांत सिंग आत्महत्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. पण आता याप्रकरणात भाजप कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक करणारे संदीप सिंह यांचे बॉलिवूड इंडस्ट्री आणि ड्रग्जबाबत असलेले संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
सुशांत मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचला होता,नाव मिळविले होते. असे यश मिळत असतानाही टोकाचे पाऊल उचण्याचा विचार सामान्य व्यक्तीच्या मनात येणार नाही. परंतु मानसिक स्थिती चांगली नसलेली व्यक्ती काहीही करू शकते. सुशांतवर उपचार सुरू होते याची माहिती असतानाही सीबीआय चौकशीचा घाट घातला गेला आहे. चौकशीची ही फाईल बिहार निवडणूकीपर्यंत चर्चेत राहील किंवा बिहार पोलीस ,भाजप नेते यांनी जे आरोप केले आहेत ते सिद्ध करू शकतील हे येत्या काळात स्पष्ट होईल.अन्यथा सीबीआयकडे असलेल्या फाईलच्या गठ्यात ही फाईलही बांधली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here