जंगली श्वापदांचा मानवी वस्तीतील वावर थांबविण्यासाठी त्वरीत ठोस उपाययोजना करा – खा. धानोरकर
अमोल राऊत

चंद्रपूर : येथील महाऔष्णिक केंद्र परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने कु. लावण्या उमाशंकर दांडेकर या पाच वर्षीय बलिकेला पर्यावरण चौकातील न्यू एफ टाईफ क्वार्टर जवळ ती रस्त्यावर चालत असताना अलगद उचलुन नेले. रस्त्यापासून 50-60 फुटावर त्या मुलीचा मृतदेह आढळला. दि. 26 ऑगस्ट 2020 च्या सायंकाळी 6 वाजता घडलेल्या या भयंकर घटनेमुळे या वसाहतीत दहशतीचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर खा. बाळा धानोरकर यांनी हिराई विश्रामगृह येथे चंद्रपुर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य महाप्रबंधक सपाटे व मुख्य वनसंरक्षक प्रवीण, यांचे सोबत बैठक घेतली व चर्चा केली.
या बैठकीत या हृदयद्रावक घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करीत खा. धानोरकर यांनी मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्याकरिता ठोस उपाययोजना करून अश्या घटना टाळण्याचे निर्देश दिलेत.
खा. बाळा धानोरकर यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह व सी.आय.एस.एफ. चे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व तेथील सी.आय.एस.एफ चे कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांचे सोबत चर्चा केली. या क्वार्टर परिसरातील झुडुपे कटिंग करून परिसर मोकळा करणे, जाळी व तारेचे रोलर लावणे, कंपाउंडची उंची वाढविणे, ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत पडली आहे. तिथे त्वरित दुरुस्ती करणे. स्ट्रीट लाईट पूर्ण सुरू करणे. जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून जागा मोकळी करणे, शक्य तेवढ्या लवकर सी.आय.एस.एफ च्या 120 कर्मचाऱ्यांना कॉलनी वसाहतीतच क्वार्टर अलॉट करणे. तसेच या कर्मचारी कुटुंबियांच्या सोयीसाठी पर्यावरण चौकातून क्वार्टर्स पर्यंत बस आणणे, मुलांसाठी जवळच ग्राऊंड इकवीपमेंट लावणे, तसेच क्वार्टर्सना वाँटर पृफिंगचे काम, इमारतीचे दरवाजे उंच करणे, सुरक्षा व्यवस्था वाढविणे इत्यादी सूचना खा. धानोरकर यांनी केल्या. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील हाय अलर्ट राहून रॅपिड फोर्स तात्काळ उपलब्ध करून देणे, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावणे. तसेच पीडित कुटुंबाला पंधरा लाखाचे अर्थसहाय्य त्वरित देण्याचे निर्देश दिलेत.
या वेळेस खा. धानोरकर यांचे सोबत विनोद दत्तात्रेय, सोहेल शेख, शत्रुघ्न येरगुडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.