अबब ! चार चाकी गाडीत तब्बल शेकडो प्रवासी…

0
674

अबब ! चार चाकी गाडीत तब्बल शेकडो प्रवासी…

स्मार्ट ग्राम बिबीचा ‘आदर्श’ घोटाळा चर्चेत

निधीत 2.42 लाखांची अफरातफर

– प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा उपसरपंच देरकर यांचा डाव फसला

– तीनही बसेसचे गाडी क्रमांक कारचे

– ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दिलेला नवा बस क्रमांक MH34BR0024 देखील चारचाकी कारचच

– बोगस आणि भोंगळ कारभार उघडकीस

– उपसरपंच प्रा.देरकर ज्या संस्थेत काम करतात त्याच संस्था सचिवाची कार निघाल्याने खळबळ

कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबी सध्या नवनवीन घोटाळ्याने चर्चेत आहे. गावातील रास्त भाव दुकान अनियमिततेमुळे निलंबित झाले, गावात वॉटर एटीएमचा निधी वितरित होऊन प्रत्यक्षात केवळ भूमिपूजन फलक अस्तित्वात असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले होते. आता, पुन्हा एक ‘आदर्श’ घोळ माहीतीच्या अधिकारातून समोर आला असून नागरिकांत खमंग चर्चा सुरू झाली आहे.

बिबी ग्रामपंचायतीने फेब्रुवारी 2020 मध्ये आदर्श ग्राम अभ्यास दौरा पाटोदा, शनिशिंगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार येथे शेकडो गावक-यांसह केला. मात्र या दौराचे खोटे व बनावटी बिल सादर करून सरपंच मंगलदास गेडाम व उपसरपंच आशिष देरकर यांनी स्मार्ट ग्राम निधीतील 2 लाख 42 हजार रुपयांची उचल बोगस बिले दाखवून केल्याचे समोर आले आहे. आदर्श दौरानिमीत्त प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या 50 आसन क्षमतेच्या ट्रॅव्हल्सचा गाडी क्रमांक चक्क चार चाकी फोर व्हिलरचा असल्याने अबब ! चार चाकी गाडीत तब्बल शेकडो प्रवासींचा ‘आदर्श घोळ’ उघड झाल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी पुराव्यासह गावक-यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डीले यांचेकडे केली आहे.

बिबी ग्रामपंचायतीच्या बिलात ट्रॅव्हल्सचे जे बस क्रमांक दाखवले त्यात एमएच 34 बिएफ 0024 सिटर्स बसने प्रवास केल्याचे सादर केले. प्रत्यक्षात आरटीओकडे तपासणी केल्यानंतर सदर गाडी क्रमांक कारचा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही कार बिबी ग्रामपंचायत उपसरपंच प्रा.आशिष देरकर ज्या गडचांदूर शिक्षण प्रसारक संस्थेत  काम करतात त्या संस्थेचे सचिव धनंजय गोरे यांची असल्याचे समोर आले आहे. तसेच, एमएच 34 बिएफ 0530 ही मिनी बस व एमएच 34 बिएफ 8509 हा गाडी क्रमांक बसचा असल्याचे ग्रामपंचायत बिबीने दाखविले. मात्र, सर्व गाडी क्रमांक कारचे असून सदर बिले बोगस असल्याची माहिती पुढे आली. एकंदरीत 4 चाकी तीन कारमध्ये शेकडो नागरिकांनी प्रवास केल्याचे दाखवून शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेची फसवणूक सरपंच व उपसरपंच यांनी केली आहे.

आवश्यक कामांवर निधी खर्च करण्याऐवजी बोगस व शासनाची फसवणूक करणारे बिल सबमिट करून शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक करण्यात आली. हा दखलपात्र गुन्हा असून सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच संतोषकुमार पावडे, चंद्रशेखर चटप, भारत आत्राम, स्वप्निल झुरमुरे, विजय हंसकर, सचिन सिडाम, राजेश खनके, सुनिल भोयर, हबीब शेख, संतोष उपरे, लक्ष्मण डाखरे, सुनिल जांभुळकर, सुरेंद्र गिरटकर, राकेश विरुटकर यांनी केली आहे. बिबी ग्रामपंचायतीचा वारंवार भोंगळ कारभार उघड होत आहे. आता मुख्य कार्यपालन अधिकारी काय कारवाई करतील, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

#############

1 लाख 21 हजार रुपये गावक-यांची लोकवर्गणी गायब

आदर्श गाव अभ्यास दौ-यानिमीत्त 121 गावक-यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये अशी 1 लाख 21 हजार रुपये लोकवर्गणी काढण्यात आली. वर्गणी देणा-यांनाच आदर्श दौ-यात नेण्यात आले. लाखो रुपयांची लोकवर्गणी गावक-यांकडून घेवूनही २ लाख ४२ हजारांची बोगस बिले जोडून रक्कम उचल करण्यात आली. सरपंच, उपसरपंचाने गावक-यांची लोकवर्गणीही गायब केली असून निधी असतांना लोकवर्गणीचा पैसा गेला कुठे ? अशी गावक-यात चर्चा आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here