राष्ट्रसंतांच्या भजनांनी घडली चिमूर क्रांती!

0
765

राष्ट्रसंतांच्या भजनांनी घडली चिमूर क्रांती!

स्वातंत्र्य लढ्यात चिमूर चे योगदान

क्रांती दिन ; गाथा चिमूरक्रांतीची

आशिष गजभिये
चिमूर (चंद्रपूर)

८ आगस्ट १९४२ ला ग्वालिया टॅंक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनातुन महात्मा गांधींनी ‘करा अथवा मरा’ चा नारा दिला . गांधीजीच्या संदेशाने सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला.चिमूर येथील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृतीद्वारे स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.यातून प्रेरित होऊन युवक,वृद्ध व महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला १६ ऑगस्ट १९४२ ला तत्कालीन सर्कल इन्स्पेक्टर जरासंघ,पोलीस कांताप्रसाद,नायब तहसीलदार सोनवाणे, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांचा वध केला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने प्रेरित होत युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकविल्याची घटना या शहरात घडली होती.

 

भारतातील अनेक संस्थानावर मोघल,अकबर व औरंगजेब आदी राजांनी आक्रमक करून सत्ता उपभोगली.मात्र या सर्वांमध्ये भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल १५० वर्ष्याच्या कारभारामध्ये भारतीयांवर अन्याय अत्याचार करून जेरीस आणले होते.इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची एक लाट निर्माण झाली होती.या साठी भगतसिंग, राजगुरू या सारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरुद्ध पेटून उठले,तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वात शांतीच्या मार्गाने देशभरात आंदोलन सूरु होते.

 

८ आगस्ट १९४२ ला मुंबईतील ग्वालिया टॅंक मैदानातून महात्मा गांधींनी दिलेल्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले.१६ ऑगस्ट १९४२ ला सकाळी ९.०० वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली.काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार,सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे,दादाजी किरीमकर,मारोती खोबरे,गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते.ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकापासून निघाली.या प्रभातफेरीत ‘व्हाइसरॉय दिल्ली मे, जुते खाये गल्ली में’ ही घोषणा गर्जत होती.प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली हा दिवस नागपंचमीचा होता. दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रवचन सुरू होते.या प्रवचनामध्ये ४०० – ५०० नागरिक सहभागी झाले होते.तत्कालीन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजांपुढें आपली बाजू मांडली होती.महाराजांनी दोघांनाही समजावले दोघेही आपल्या ठिकाणी योग्य आहेत.तुम्ही दोघेही आपले काम करा तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल,असा सल्ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना दिला.

 

आदल्या दिवशी राष्ट्रसंताचे देशभक्तीच्या विचारांनी ओतप्रोत भरलेले प्रभावी भजन झाले.या भजनाने क्रांतीकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटली.सर्वांच्या मनात फक्त क्रांती, क्रांती आणि क्रांती हाच शब्द घुमत होता.भारतमातेचे स्वतंत्र रूप क्रांतीकारकांना दिसत होते. ‘गुलामी अब नहीं होना,हमारे प्रिय भारत देश में’ आणि ‘ पत्थर सारे बाम बंनेंगे भक्त बंनेंगी सेना ‘ या भजनाने क्रांतिकारकांची मने पेटली.परिणामी इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड पुकारला. सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला.सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येऊन ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देऊ लागले तेवढ्यात इंग्रज पोलिसांनी स्वातंत्र्यवीरांच्या हातातील झेंडा हिसकावून घेतला. १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकाऱ्यांकडे वळविला. क्रांतिकारकानीं इंग्रज अधिकारी डुंगाजी, सर्कल इन्स्पेक्टर जरासंघ, तहसीलदार सोनवाणे व कांताप्रसाद यांचा वध केला. अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला. बालाजी रायपुरकर , श्रीराम बिंगेवार व बाबूलाल झिरे यांना वीरमरण आले.१६ ऑगस्ट १९४२ च्या क्रांतीमुळे पूर्ण देशामध्ये चिमूर शहराचे नाव दुमदुमले. या स्वातंत्र्याची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली होती.चिमूर शहरातील १६ आगस्ट १९४२ ची क्रांती देशामध्ये अजरामर झाली. क्रांतीच्या ज्वालांमधूनच चिमुरात स्वातंत्र्याची पहाट उगवली होती.

 

चिमूर क्रांतीलढ्यातील शहीद
१) बालाजी रायपुरकर
२) श्रीराम गंगाराम बिंगेवार
३) बाबूलाल पंचमसिंह झिरे
४) वारलू बालाजी चन्ने
५) मनिराम धोंडू गोंड
६) पत्रू वारलू भुसारी
७) उद्धव खेमस्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here