कटाक्ष:मोदी, बोध घ्या! जयंत माईणकर

0
301

 

कटाक्ष:मोदी, बोध घ्या! जयंत माईणकर

तुम्हाला अमेरिकन लोकांना खोटं सांगितल्याचा खेद वाटतो का,’ असा थेट सवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना एका पत्रकाराने विचारला.

“मिस्टर प्रेसिंडेट, तुम्ही अमेरिकन लोकांना ज्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल आज साडेतीन वर्षांनी तुम्हाला खेद वाटतो का?”अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या थेट प्रश्नाने राष्ट्राध्यक्ष ट्रंप गडबडलेले दिसले.प्रश्न ऐकू न आल्याचं भासवत त्यांनी विचारलं, “काय सगळं?” (All the What?)त्यावर प्रश्न विचारणारे आणि मुळ पुणेकर असलेले पत्रकार शिरीष दाते यांनी म्हटलं, “सगळ्या खोट्या गोष्टी, असत्य…जे तुम्ही सांगितलंत.”ट्रंप या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून थेट पुढच्या प्रश्नावर गेले. पण हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची चर्चा सुरू झाली.

शिरीष दाते, हफिंग्टन पोस्टचे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट’ म्हणजेच व्हाईट हाऊसचं वार्तांकन करणारे प्रतिनिधी आहेत. हा प्रश्न विचारल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. या पत्रकार परिषदेनंतर दातेंनी ट्वीट केलं, “पाच वर्षं मला त्यांना हे विचारायचं होतं. दाते यांनी विचारलेल्या या प्रश्नानंतर सोशल मीडियावरून एकीकडे ट्रंप विरोधक त्यांचं कौतुक करत आहेत, तर ट्रंप यांचे समर्थक त्यांच्यावर टीका करत आहेत. एस. व्ही. दाते या नावाने लेखन करणाऱ्या शिरीष दातेंनी जानेवारी महिन्यात ‘द मिनिस्ट्री ऑफ अनट्रुथ’ (THE MINISTRY OF UNTRUTH) नावाचा एक प्रदीर्घ लेख लिहिला. ट्रंप यांनी आतापर्यंत वेळोवेळी केलेले दावे आणि विधानं या लेखात पडताळून पाहण्यात आली आहेत.शिवाय दाते ट्रंप यांच्या दाव्यांतल्या विरोधाभासांबद्दल वेळोवेळी ट्वीट्सही करत असतात.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांशी गेल्या सहा वर्षात एकदाही बोलले नाहीत. पुढील चार वर्षात बोलण्याची शक्यता नाही. २३ सप्टेंबर २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ वर्षात त्यांनी सुमारे २५ ते ३० पत्रकार परिषदा घेतल्या असतील. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक प्रकाशनाच्या केवळ एक प्रतिनिधीला आपल्या बंगल्यावर जेवायला बोलावण्याचा त्यांचा प्रघात. ही एकमेव पत्रकार परिषद वगळता मोदी कधीही पत्रकारांशी बोललेच मला स्मरत नाही. मार्च २००३पर्यंतच्या बहुतेक पत्रकार परिषदांना त्यावेळी मी गुजरात मध्ये असल्याने हजर होतो.पण त्या वेळपासूनच मोदींना पत्रकारांशी बोलणं आणि त्यांच्या अडचणींच्या प्रश्नांना तोंड देण आवडत नाही याची कल्पना येत होती. कॅबिनेट मध्ये झालेले निर्णय सांगायला त्यावेळी मोदींचे उजवे -डावे हात असलेले मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि इंद्रविजयसिंग जडेजा यायचे आणि निर्णयाचं पत्रक वाचून दाखवायचे. कुठलाही राजकीय प्रश्न विचारला तर हा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये नव्हता त्यामुळे त्यावर आम्ही भाष्य करणार नाही, अस सांगून मोकळे व्हायचे. तरीही माझी आणि मोदींची दोन वेळा व्यक्तिगत भेट झाली आणि त्यापैकी एकावेळी मी त्यांची मुलाखतही घेतली. माझी गुजरात मधुन भोपाळला बदली झाल्यामुळे ब्युरो चीफ या नात्याने मी त्यांचा निरोप घ्यायला गेलो होतो. मोदींना संघाची मातृभाषा मराठी ही उत्तम प्रकारे बोलता येते. तर साडेपाच वर्षाच्या माझ्या गुजरात च्या वास्तव्यात मी बऱ्यापैकी गुजराती बोलायला शिकलो होतो.ते माझ्याशी मराठीत बोलायचे तर मी त्यांना गुजरातीत उत्तर देत असे. त्यावेळीही मी दर आठवडायाला पत्रकार परिषद घ्या असा विषय काढला.माझ्या सरळ प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांनी इतर कुठल्याही राज्यात पत्रकार परिषद होत नाही अस म्हणत हरयाणाचा दाखल दिला. भारतातील आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या राज्याच्या मुखमंत्र्याने आपली तुलना छोट्या राज्याशी करण मला पटलं नव्हतं. महाराष्ट्रात शरद पवार आणि खुद्द गुजरातमध्ये खुद्द केशुभाई पटेल दर आठवड्याला पत्रकार परिषद घ्यायचे, हे मी सांगितले. आपल्या राजकीय विरोधकांच उदाहरण त्यांना फारसं रुचल नव्हतं. त्यांनी नुसता विषयच पालटला इतकाच नाही तर मिटिंग सुद्धा आटोपती घेतली. २००७ला विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर काही कामानिमित्त मी मुंबईहून अहमदाबाद ला गेलो होतो. त्यावेळी त्यांचे जनसंपर्क अधिकारी होते माझे मित्र स्व जगदीश ठक्कर. भेटण्याची विनंती करणारी चिट्ठी ठक्कर यांच्या मार्फत पाठवली. आणि मला लगेच बोलावण्यात आले.त्यावेळच्या मुलाखतीतील दोन मुख्य प्रश्न होते ते म्हणजे मोदी स्वतः ला पंतप्रधानपदाची दावेदारी करणार का आणि केशुभाई पटेल आणि गोरधन झडफिया या प्रवीण तोगडिया यांच्या शिष्याने सुरू केलेल्या सरदार पटेल संघर्ष समिती यांच्याबरोबर काही सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणार का? हे दोन्ही प्रश्न आज १३ वर्षांनीही तितकेच महत्त्वाचे आहेत. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले पंतप्रधानपदी अडवाणीच बसले पाहिजेत. तर विरोधात असलेल्या केशुभाई पटेलांविषयीच्या प्रश्नाला नेहमीप्रमाणे बगल दिली. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे होते. ९२ वर्षाचे अडवाणी आज पक्षात स्वतः च अस्तित्व शोधत आहेत. तर ८०च्या घरात पोचलेले केशुभाई गेली १९ वर्षे शांत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी पंतप्रधान म्हणून मोदींनी एकमेव पत्रकार परिषद घेतली. पण सर्व प्रश्नांची उत्तरे शहानी दिली. मी पत्रकारांशी नव्हे तर जनतेशी डायरेक्ट संवाद साधतो, हे त्यांच एक जाहीर सभेतील वाक्य. जाहीर सभेत त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही .तर सोशल मीडियावर ते स्वतः ला अभिप्रेत असलेले शब्द लिहून मोकळे होतात आणि पुढे त्यांचे भक्त आणि विरोधक यांच्यात वाद होत राहतो. मोदींना उत्तरे देण्याची गरजच नसते. त्यांची भाषणे म्हणजे एक मोनोलॉग किंवा मन की बात असते.त्यामुळे मनात असलेले प्रश्न कधी मोदींना विचारता येण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच ते प्रश्न मी माझ्या लेखाच्या माध्यमातून विचारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रश्न पुढील लेखात विचारणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here