या गावात स्वातंत्र्यानंतर झाले पहिले ध्वजारोहन

0
450

या गावात स्वातंत्र्यानंतर झाले पहिले ध्वजारोहन

गावबैठकीत गावकऱ्यांनी मंजूर केले ९ ठराव

गडचांदूर :नितेश शेंडे

माणिकगड पहाडाच्या कुशीत हरपलेले एक गाव… गडचांदुर या औद्योगिक नगरीपासून २५ किलोमिटर अंतरावर वसलेला निजामकालीन गुडा म्हणजे घोडणकप्पी ! स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व प्रशासकीय नियमांचे पालन करत गाव बैठक पहिल्यांदा पार पडली. या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होताना गावकऱ्यांचा उर भरून आला. बा, स्वातंत्र्या ७३ वर्षां नंतर तू आमच्या गावात आला… अशी लोकभावना गावकऱ्यांनी  प्रतिनिधी यांचे समोर बोलून दाखवली.

लॉकडाऊन काळात माणिकगड पहाडावरील १४९६ आदिम कोलाम बांधवांना अन्नधान्य किट्स वितरण कोलाम सहाय्यता अभियानांतर्गत लोकसहभागातून करण्यात आले. त्यावेळी घोडनकप्पी गावात अन्नधान्य किट्स वितरण करण्याकरिता माजी आमदार वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे विकास कुंभारे व पाथ फाऊंडेशनचे दीपक चटप गेले होते. १९९५-९६ साली माजी आमदार वामनराव चटप यांनी या गावातील लोकांना उपलब्ध निधीतून टेकडावर घरे बांधून दिली. मात्र, पाण्याची गैरसोय होती. २०० फूट खाली उतरून एका नाल्यातील पाणी आणावे लागे. तेव्हा, सरकारने बांधलेली टेकडावरची घरे सोडून या गावातील २३ कुटुंब मूळ ठिकाणी परतले. आज त्या शासकीय घरांचे पत्रे नाही, दरवाजे नाही आणि संपूर्ण दुर्दशा झाली आहे, ही बाब पुन्हा लक्षात आली. तेव्हा, डोंगरकपारीत हरवलेल्या या गावात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरले. त्यानंतर मागील महिन्यात गावाची बैठक झाली. या बैठकीत गावाच्या समस्यांविषयी चर्चा झाल्यानंतर या गावातील लोकांना त्यांचा खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी माहित नाही असे विदारक चित्र समोर आले. तेव्हा इथेच येणारा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निश्चय दृढ झाला असे विकास कुंभारे व दीपक चटप यांनी सांगितले.

घोडणकप्पी गावात एक बैठक पार पडली असून स्वतंत्रता जागर अभियान हा कार्यक्रम येथे स्वातंत्र्य दिनी होणार असल्याचे काही लोकप्रतनिधीना कळताच त्यांनी एका आठवड्यात गावात एक सिमेंट रस्ता तयार केला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात रस्ता आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावाचे रामू पाटील यांच्या हस्ते मूळ गावात पहिले ध्वजारोहन पार पडले. या क्षणाला गावकऱ्यांचे मन भरून आले. त्यानंतर गावातील समस्यांविषयी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे लाक्षणिक उपोषण सुरू झाले. स्वरप्रिती अकादमी राजुरा येथील अल्काताई सदावर्ते व गडचांदुर येथील पूजा संतोष टोंगे यांच्या सुमधुर स्वरांनी येथील परिसर निनादून गेला. त्यानंतर दीपक चटप, दिलीप सदावर्ते, अतुल गोरे, मारोती सिडाम आदींनी उपस्थितांशी संवाद साधला.

” बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणोनि कळवळा येत असे ” या भावनेतून या गावात स्वतंत्रता जागर अभियान राबवत पहिल्यांदा ध्वजारोहण व गाव समस्यांचे ठराव घेणारी सभा पार पडली आणि या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होता आले. यापुढेही उपेक्षित समुदायाच्या समस्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत राहू असे पाथ फाऊंडेशनचे दीपक चटप यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी मंजूर केलेले काही महत्वपूर्ण ठराव

१.घोडणकप्पी गावाला जोडणारा रस्ता तातडीने मंजूर करावा.
२. गावाला शुद्ध पाणी उपलब्ध करून नळयोजना कार्यान्वित व्हावी.
३. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व कुटुंबांना शौचालय देण्यात यावी.
४. गॅस कनेक्शन व सिलेंडर सर्वांना देण्यात यावे.
५. गावात अंगणवाडी इमारत तातडीने करावी व रिक्त अंगणवाडी मदतनीस जागा भरावी.

आज गावातील लोकांना नाल्यातील पाणी प्यावे लागते. ये-जा करणेकरिता गावाला जोडणारा रस्ता नसल्याने गर्भार माता, रुग्ण आदींना मरण यातना सोसाव्या लागत आहे. दरम्यान गावकऱ्यांनी संबोधित करताना माजी आमदार वामनराव चटप यांनी मला वगळता एकही आमदार या उपेक्षित भागात पोहचू शकला नाही हे दुर्दैवी असल्याचे म्हणत टेकडीवर घरे, शाळा, अंगणवाडी आदी सोय आम्ही केली होती. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधीनी मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले आणि आज गावकरी मूळ गावात परतले असल्याने भीषण आयुष्य जगताना दिसतात तेव्हा ” हे स्वातंत्र्य नासले का ? ” हा प्रश्न माझ्या मनाला पडतो. गावाच्या समस्यांचा पाठपुरावा प्रशासनाकडे करून मूलभूत गरजा तातडीने उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कोलाम विकास फाऊंडेशनचे विकास कुंभारे म्हणाले की, मंजूर झालेले सर्व ठरावाच्या प्रती संबधित विभागाला पोहचवू. वेळप्रसंगी येणाऱ्या काळात आंदोलन करू. मात्र, या उपेक्षित आदिम समुदायांचे प्रश्न सुटले पाहिजे. या गावात हरवलेला विकासाचा सूर्य पुन्हा उगवेल आणि त्यासाठी खऱ्या संघर्षाची सुरवात आजच्या लाक्षणिक उपोषणातून केली असल्याचे ते म्हणाले.

एकंदरीत स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत गेल्या पाहिजे. उपेक्षित घटकांपर्यंत संविधानाचे अधिकार पोहचले पाहिजे. आपणही या देशाचा भाग असल्याची भावना डोंगरकपारीत राहणाऱ्या समुदायांना वाटली पाहिजे. या उदात्त हेतूने स्वातंत्र्यानंतर मूळ घोडणकप्पी गावात झालेले ध्वजारोहण, प्रशासकीय नियम पाळत पार पडलेली पहिली गाव बैठक यातून स्वातंत्र्याचा सूर्य ७३ वर्षानंतर उजाडेल आणि त्यासाठी संघर्ष करण्याची उमेद गावकऱ्यांत निर्माण झालेली दिसली. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बाहेर गावून आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना गाव गहिवरून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here