कटाक्ष:वाद चिकित्सा पद्धतीचा की प्रभुत्वाचा! जयंत माईणकर

0
499

 

कटाक्ष:वाद चिकित्सा पद्धतीचा की प्रभुत्वाचा! जयंत माईणकर


आयुर्वेद! पाचवा वेद म्हणून ज्याचा उल्लेख वैदिक परंपरेत केला जातो अशा जुन्या वैद्यकीय शास्त्रावर आधारित चिकित्सा पद्धती!

चरक आणि सुश्रुत या आचार्यांनी स्थापन केलेल्या विचारशाला यात महत्वाच्या आहेत .

आयर्वेदाच्या दृष्टीने शरीरातील सर्व रोगांचे मूळ वात , पित्त आणि कफ हे तीन दोषात आहे तर नाडी, मूत्र, मल , जिंव्हा , शब्द, स्पर्श , दृक, आकृती, या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात. म्हणजेच तीन दोष आठ निदान पद्धती याच्यापुढे मानव जातीच्या उत्क्रांतीत आलेले अनेक विषाणू यांच्याबाबतीत ही तथाकथित ‘दैवी’ चिकित्सा पद्धती सूचक मौन बाळगते. किंवा मोदी स्टाईलने प्रश्नांना उत्तरच देत नाही.

आयुर्वेदात साइड इफेक्ट नाही हा प्रचार केला जातो. पण आपल्या औषधांच्या शास्त्रीय परीक्षा केल्या आहेत का याच उत्तर केवळ नकारार्थी असत.
अमेरिकन एफ डी ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे. ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत; आयुर्वेदिक औषधाच्या दुष्परिणामांना आम्ही जवाबदार नाही असेही अमेरिकन FDA ने म्हटले आहे .

 

 

मग आयुर्वेदाला चिकित्सा पद्धती मानावी की जीवनपद्धती? तर माझ्या दृष्टीने ही एक केवळ चांगलं आरोग्य राहण्यासाठी मार्ग सांगणारी जीवन पद्धती ज्यात काही प्रमाणात औषधांचाही समावेश आहे.

म्हणजे आयुर्वेद स्वतःच्या मर्यादा आखून घेत आणि त्या मर्यादेच्या बाहेर पडण्याची त्यांची इच्छाच नसते. त्यामुळे रक्ताचे चार ग्रुप , In vitro fertilization (IVF) , open heart surgery, angioplasty यासारख्या मानवी जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या अ‍ॅलोपॅथीने विकसित केलेल्या अनेक चिकित्सा पद्धतीविषयी आयुर्वेद अनभिज्ञ आहे. एक प्रकारे चरक आणि सुश्रुत यांच्या पलीकडे आयुर्वेद गेलंच नाही. जणूकाही जगातील त्या काळात अस्तित्वात असलेले आणि अगदी आत्ता कोरोनपर्यंतच्या आणि पुढेही येणाऱ्या (?) सर्व रोगांवरील रामबाण (?) औषध म्हणजे चरक आणि सुश्रुत असा काहीसा आधुनिक विज्ञानाला न पटणारा एककल्ली कारभार.

 

महर्षी चरकाने ‘काया-चिकीत्सा’ (म्हणजे औषध) यावर लक्ष केंद्रीत केलेला ग्रंथ म्हणून चरक-संहिता लिहिली, तर महर्षी सुश्रुत यांनी ‘शल्य-चिकित्सा’ (म्हणजेच शस्त्रक्रिया) यावर सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला. पण याच्यापुढे जाण्याचं प्रयत्न आयुर्वेदाने शास्त्रीय दृष्टीने केलेला दिसत नाही. त्यामुळे रोगनिदानाच्या कोणत्याहि आधुनिक पद्धती शिवाय आणि जीवाणूच्या इन्फेक्शन कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आयुर्वेद एकप्रकारे आत्ममग्न (आत्मनिर्भर नव्हे) राहतो. आयुर्वेदात एकजरी गुणकारी औषध असते तर धंदेवाईक चालू कंपन्यांनी ते सोडले असते काय ? त्या औषधाचे स्वामित्व मिळवुन त्याचा जगभर व्यापार करण्याची संधी सोडुन द्यायला या कंपन्या मूर्ख आहेत काय ? आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात मध्ये आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही , हा मला पडलेला बाळबोध प्रश्न!

जी गोष्ट आयुर्वेदाची तीच होमिओपॅथीची. मानवी शरीर हे केवळ १२ क्षारांचे मिळून बनलेले आहे असं मानणाऱ्या या पॅथीचे जनक क्रिस्टिआन फ्रीड्रिक झामूएल हानेमान .

होमिओपॅथी ही समचिकित्सेच्या नियमावर आधारित औषधप्रणाली आहे. या उपचारपद्धतीचा शोध हानेमान या
जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांनीलावला, म्हणून तिला ‘हानेमानिझम’ किंवा ‘होमिओपॅथी’ हे नाव दिले. पण होमिओपॅथीला चिकित्सा पध्दती न मानणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे.
भारतात आयुर्वेदसाठी बी ए एम एस आणि होमिओपॅथी साठी बी एच एम एस असे डिग्री कोर्सेस आहेत.

मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत अपघाताने मार्कस कमी पडले म्हणुन हुशार विद्यार्थी आयुर्वेद शाखेत प्रवेश करतो. तर त्याहून कमी मार्क्स पडलेले होमिओपॅथी किंवा जनावरांचे (veteranary)डॉक्टर बनून आपल्या मागे डॉक्टर ही उपाधी लावून घेतात.सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे जनावरांचे डॉक्टर!
आज महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातील खेड्यापाड्यांमध्ये बेसिक वैद्यकीय सेवा पुरवण्याच काम ही आयुर्वेद आणि होमिओपॅथीची डिग्री घेऊन डॉक्टर झालेली मंडळी करतात. मात्र हे सर्व डॉक्टर
अ‍ॅलोपॅथीची औषधे देतात ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांच्यावर ते करण्यास बंदी घातल्यास तालुका आणि खेड्यात वैद्यकीय सेवा मिळणार नाही. कारण एम बी बी एस झालेले विद्यार्थी अशा ठिकाणी जाण्यास तयार नसतात. अशा वेळी याच डॉक्टरांचा सहारा असतो. मोठ्या शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये हेच होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर उमेदवारी करून बेसिक knowledge मिळवितात आणि त्याच्या भरवशावर छोट्या गावात स्वतः च क्लिनिक किंवा हॉस्पिटल थाटतात. बरोबर औषधाचे दुकानही उघडतात आणि त्यात गैर काहीच नाही.

पण आयुष मंत्रालय तयार करून आयुर्वेद , आणि निसर्गोपचार पद्धतीच कायदेशीर रीत्या उदात्तीकरण केल्यानंतर आत्तापर्यंत स्वतःच्या मर्यादेत असणाऱ्या या आयर्वेदाच्या भलामण करणाऱ्यांच्या कक्षा रुंदावत गेल्या. आणि त्यातूनच विदेशी कंपन्या नफा कमावतात म्हणून तोंडसुख घेण्याची संधी साधली गेली आणि नो साईड इफेक्ट्स या नावाखाली गोमूत्रापासून तर
फलघृतापर्यंत (गायीचे तूप) सर्वच उत्पादनाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू झालं. राजाश्रय मिळाल्यानंतर गोशाळेपासून तर गायीच्या दुधापासून उत्पादने
बनवण्यासाठी सरकारी जागा कमी दरात मिळण्याची सोय झाली. आणि मग हिंदुत्वाच नाव घेत रवीसारखे पोट घुसळणारे रामदेवबाबा पण तयार झाले. एकेकाळी परदेशातील काळा पैसा आणण्याचा मुद्दा उचलून धरत नरेंद्र मोदींना मदत करणाऱ्या या योगगुरूनी आपले शब्दरुपी बाण चालवले चक्क अ‍ॅलोपॅथीक डॉक्टर्स च्या विरुद्ध! नंतर भलेही त्यांनी माफी मागितली असली तरीही त्याला अर्थ नसतो. आयुषरूपी राजाश्रय मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या चुका साहजिकच आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किंवा ‘supportive medicine’ म्हणून आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो. पण मुख्य औषध म्हणून नाही. राजाश्रयाने बेछूट सुटलेल्या रामदेव बाबांनी
देशातील औषधाचे मार्केट आपल्या पतंजली उद्योग समूहाकडे खेचण्याचा तथाकथित प्रयत्नही केला. मात्र आपला संघर्ष औषध माफिया विरुद्ध असल्याचा कांगावाही त्यांनी केला.
मध्यंतरी, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ वल्लभ कथीरिया यांनी जशी गोविज्ञान परिक्षा घेण्याचा निर्णय जाहीर
करून मागे घेतला तसलाच हा रामदेवबाबा यांचा प्रकार दिसत आहे. येनकेनप्रकारेण आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुत्वाचा अजेंडा रेटायचा आणि अंगावर आल तर माफी मागून पळ काढायचा ही त्यांची स्ट्रॅटेजी! गोविज्ञान परीक्षा अंगावर आल्यानंतर डॉ कथीरिया नी राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पळ काढला. आत्ताही औषध माफिया कंपन्यांच्या विरुद्ध कांगावा करत योगगुरूनी माफी मागत पळ काढला आहे.
हा वाद चिकित्सा पद्धतीचा नसून औषधांच्या बाजारावरील प्रभुत्वाचा आहे. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here