“बळीराज्याचे स्वप्न – मृग नक्षत्राचे पाऊल” 

0
669

 

राजूरा (चंद्रपूर )-{✍🏻किरण घाटे, विशेष प्रतिनिधी } महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील काव्यकुंजच्या जेष्ठ सदस्या तथा लेखिका सविता संजय भाेयर यांनी !!बळीराज्याचे स्वप्न -म्रूग नक्षत्राचे पाऊल !!हा एक लेख शब्दांकित केला आहे .ताे आज खास वाचकांसाठी येथे देत आहाे .

मृग नक्षत्राची छाया पडली, बळी राजाचे मन उधाण वाऱ्याप्रमाणे वाहू लागले. बीज पेरणीला सुरुवात झाली. शेतात तीफन चालू लागली. सर्जा राज्याची जोडी आनंदाने डोलू लागली. घरची लक्ष्मी बीज ओटीत भरून, पोटाला बांधून बळीराजाच्या तिफणीबरोबर चालू लागली. मुठीत भरलेला बीज बियाण्याचा एक हात तीफणीवर, तर दुसरा हात कपाळावरचे घाम पुसत ! बळीराजा आनंदाने पावसाची वाट बघू लागला. शेतात बसून डोळ्यांवर हात ठेवून मेघराज्याची आतुरतेने वाट बघू लागला. त्याच्या मनात आस लागली की पाऊस येणार आणि धरतीला चिंब भिजवणार, मग बीज अंकुरनार, त्याचे रोपटे होऊन.. हाताला पीक येणार. किती स्वप्न रंगविली होती बळीराजानी!

 

पण पाऊस आलाच नाही. बीज अंकुरलेच नाही, रोपटी उगवलीच नाही. बळीराजा हताश न होता, देवाकडे प्रार्थना करू लागला. पुन्हा – पुन्हा पावसाची वाट बघू लागला. तरीपण पाहिजे तसा पाऊस पडला नाही. पावसा अभावी त्याचे बिजबियाणे वाया गेले. बळीराजाने पुन्हा कर्ज काढून बियाणे शेतात रोवले, याच आशेने की पाऊस येईल. पण पावसाने पुन्हा दांडी मारली ! आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले..पण हवा तसा पाऊस पडलाच नाही. मृग नक्षत्रातची एक चाहूल आणि बळीराजाने पाहिलेली स्वप्न..की मृगाचा पाऊस पडेल आणि त्याची पूर्ण स्वप्न पूर्ण होईल…पण पाहिजे तसा पाऊस झाला नाही आणि बळीराजाची सर्व स्वप्न करपून गेली. धगधगत्या उन्हात काळ्या मातीत मोती फुलवू पाहणारा शेतकरी , तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मातीला जपतो. पुन्हा – पुन्हा नांगरणी करून, जमिनीला सुपीक बनवू पाहतो. टीचभर पोटाच्या भुकेपोटी दिवसरात्र राब-राब राबतो..आणि आपली छोटी स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करीत असतो. वर्षभर मेहनत करून, एक दिवस हातात आलेल्या पिकाला वादळ – वारा ,पाऊस झोडपून काढतो…खूप मोठं पिकाच नुकसान झाल्यामुळे, धान्य घरात येत नाही. घरात अन्नाचा दाणा नाही. जे धान्य पिकलं त्याला पाहिजे तो भाव मिळत नाही. उत्पन्नाचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी , मग अपुऱ्या पैशात घर चालवायचं तरी कसं या बळीराजाने… बळीराजा कर्ज कसे फेडणार, वर्षानुवर्षे उत्पन्न च मिळत नाही…कर्जाचे डोंगर वाढत जाते. आता पोट कस भरणार… ह्या सर्व विचाराने बळीराजाची चिंता वाढू लागली. शेतात बसून तो विचार करू लागला. डोक्यावर हात देऊन रडु लागला. असंख्य विचार त्याच्या मनात घोळू लागले…पैसा कुठून आणायचा. घरात अन्न धान्य नाही , मुल बाळ ही घरात उपाशी राहू लागली .

 

बळीराजाच्या डोक्यात आता फक्त एकच विचार येतो …..तो म्हणजे …”आत्महत्या”. कारण या कर्जबाजारी झालेल्या जिवाला कर्जदार खूप तगादा लावतो. सरकारी कर्जाच्या वसुलीसाठी नोटीसा येतात..बिचारा शेतकरी हवालदिल होतो..काय करावे त्याला सुचत नाही. केवळ आत्महत्येचाचं विचार त्याच्या मनात येतो. उभ्या पिकाकडे पाहून आनंदाने स्वप्न पाहणारा बळीराजा जमिनीला डोके ठेवून रडु लागतो.. त्याला कोणताही आधार उरलेला नसतो. तो पत्नी आणि मुलांचा विचार करून कासावीस होतो. खूप मेहनत करून धान्य पिकविणारा हाच बळीराजा संपूर्ण जगाला जगवितो आणि एक दिवस हताश होऊन आत्महत्या करतो.

 

कुटुंब चालविणारा जीव घरातून निघून गेल्यावर, पत्नी आणि मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी त्याची पत्नी आता काय करणार. शेती सांभाळणार ..की मुलांना सांभाळणार. सरकारची कवडी मोलाची मदत किती दिवस पुरणार . भाजी भाकर खाऊन आनंदाने जगणार हे बळीराजाच कुटुंब एका क्षणात उध्वस्त झालं. या देशात अशी असंख्य बळीराजाची कुटुंब आहेत ..ज्यांना या यातना भोगाव्या लागतात. बळीराजा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराच्या स्वप्नांचा पाहता पाहता चुराडा होतो.

 

“संसाराच्या व्यथा , सगळ्या थकल्या पाऊल वाटा !

सुख – दुःखाच्या ऊन सावल्या, कधी ना मागे वळल्या !”

 

“वळणावरती वळणं घेऊनी , जीव हा ओसावीला !

कधी ना विसावा घेऊन , फिरल्या आयुष्याच्या खुणा !”

 

 

लेखिका-

सौ. सविता संजय भोयर

सहज सुचलं काव्यकुंज सदस्या,

राजुरा, जिल्हा चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here